सोनाली कुलकर्णी झळकणार ऐतिहासिक चित्रपटात?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 05:34 PM2019-03-27T17:34:17+5:302019-03-28T10:35:52+5:30
सोनाली लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार असून हा एक बायोपिक असणार असल्याचे म्हटले जात आहे.
सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. तिच्या कारकिर्दीला नुकतेच दहा वर्षं पूर्ण झाले होते. तिचा नवीन चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहात असतात.
सोनालीच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. सोनाली लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार असून हा एक बायोपिक असणार असल्याचे म्हटले जात आहे. सोनाली तिच्या भूमिकांच्या बाबतीत नेहमीच चोखंदळ असते. त्यामुळे आता सुद्धा ती एका वेगळ्या आणि दमदार भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील तिचा लूक देखील खूप वेगळा असणार आहे.
सोनालीच्या या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून या चित्रपटाचा विषय कोणता असणार, तसेच या चित्रपटात कोणकोणते कलाकार झळकणार याबाबत सोनालीने मौन राखणेच पसंत केले आहे. सोनाली तिच्या या ऐतिहासिक चित्रपटात कोणती भूमिका साकारणार हे जाणून घेण्यासाठी तिच्या फॅन्सना काही दिवस तरी वाट पाहावी लागणार.
सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. ती ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर तर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे, ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. पण तिने अद्याप तरी सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना या चित्रपटाबद्दल काहीही सांगितलेले नाहीये.