'माफ करा 'TDM'चं प्रदर्शन थांबवतोय!', दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंनी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 03:05 PM2023-05-03T15:05:20+5:302023-05-03T15:05:53+5:30
TDM Movie : गेल्या काही दिवसांपासून 'टीडीएम' चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रीन उपलब्ध नसल्याची खंत निर्माते आणि दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडेनं बोलून दाखवली आहे. इतकेच नाही तर आता त्यांनी टीडीएमचं प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
ख्वाडा, बबन या सारख्या अस्सल गावरान ढंगातील, रंगातील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आपली वेगळी छाप उमटवणारे दिग्दर्शक म्हणजे भाऊ कऱ्हाडे (Bhau Karhade). गेल्या काही दिवसांपासून भाऊ कऱ्हाडेचा टीडीएम चित्रपट (TDM Movie) चर्चेत आला आहे. टीडीएमचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना त्या चित्रपटाचे वेध लागले होते. २८ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित झाला. टीडीएमला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर या चित्रपटाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रीन न मिळाल्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रीन उपलब्ध नसल्याची खंत निर्माते आणि दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडेनं बोलून दाखवली आहे. इतकेच नाही तर आता त्यांनी टीडीएमचं प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून भाऊ कऱ्हाडेने प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यामध्ये त्याने येत्या काळात आपण टीडीएचे शो मागे घेत असल्याचे प्रेक्षकांना सांगितले आहे. निर्मात्यांच्यावतीने एक प्रसिद्धीपत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, रसिक प्रेक्षकहो नमस्कार, मला माहिती आहे तुम्हाला 'टीडीएम' सिनेमा थिएटरमध्ये बघायची इच्छा आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मी 'टीडीएम'चे प्रदर्शन तूर्तास थांबवत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील प्रदर्शनाचे अपडेट्स लवकरात लवकर देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तुम्ही करत असलेल्या सहकार्यासाठी सर्वांचे मन:पूर्वक आभार!
टीडीएमला स्क्रिन न मिळाल्यामुळे कलाकारांनीही काही दिवसांपूर्वी थिएटरमध्येच रडत आपले गाऱ्हाणे मांडले होते. यामध्ये कलाकारांनी मराठी चित्रपटांवर कशाप्रकारे अन्याय होतो आहे. हेदेखील प्रेक्षकांना सांगितले होते. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील टीडीएमला पुरेशा स्क्रिन्स देण्यात याव्यात असे ट्विटदेखील केले होते.