मी नाट्यगृह बोलतोय: पाण्यात बुडणाऱ्या शंभरीतील दामोदरला पुर्नबांधणीची मात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 12:36 PM2022-05-13T12:36:09+5:302022-05-13T12:36:54+5:30

Damodar natyagruha: खराब झालेल्या खुर्च्यांचा त्रास; सात मजली इमारतीची योजना

special article me natyagruha boltoy Damodar natyagruha | मी नाट्यगृह बोलतोय: पाण्यात बुडणाऱ्या शंभरीतील दामोदरला पुर्नबांधणीची मात्रा

मी नाट्यगृह बोलतोय: पाण्यात बुडणाऱ्या शंभरीतील दामोदरला पुर्नबांधणीची मात्रा

googlenewsNext

संजय घावरे

मी नाट्यगृह बोलतोय (भाग - 5)

मुंबई : कामगार रंगभूमीसोबतच इतर लहान-मोठ्या कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाणारे परेलमधील दामोदर नाट्यगृह आज मनोरंजन विश्वात आघाडीवर असणाऱ्या बऱ्याच रंगकर्मींच्या कारकिर्दीचे उगमस्थान आहे. मात्र, मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या नाट्यगृहाला नेहमीच पावसाळ्यात तुंबणाऱ्या फटका बसत आला आहे. या शंभरीतील दामोदरला पावसाच्या पाण्यातून वर काढण्यासाठी पुर्नबांधणीची योजना आखण्यात आली आहे.

दामोदर नाट्यगृहाची इमारत १०० वर्षे जुनी असली तरी वयोमानानुसार आजही ताठ मानेने नाट्यरसिकांना सेवा देत आहे. काळानुरूप काही बदल करण्यात आले असले तरी इथे रसिकांना फार समस्यांना सामोरे जावे लागत नाही. पावसाळ्यामध्ये जेव्हा हिंदमाता परिसरात पाणी भरते, तेव्हा दामोदर हॅालमध्ये येण्यासाठी छातीपर्यंत पाण्यातून मार्ग काढावा लागतो. नाट्यगृहातील खुर्च्या पाण्यात बुडून रंगमंचापर्यंत पाणी पोहोचलेले असते. यामुळे दरवर्षी नाट्यगृहाला खूप नुकसान सहन करावे लागते. इथे खुर्च्यांची समस्या आहे. कुशन आणि प्लायवुड खराब झाल्याने बसल्यावर खाली सटकतात. बऱ्याच खुर्च्या बदलण्यात आल्या असल्या तरी काही खुर्च्यांची अवस्था खराब आहे. जवळपास ६० खुर्च्यांची दुरुस्ती करायच्या आहेत. पाण्यामुळे भिंतीना पोपडी आलेली असली तरी वेळेत रंगकाम केल्याने ते झाकले जाते. रंगमचावर नेपथ्याचे सामान नेण्यासाठी चांगली सुविधा आहे. स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. वातानुकूलित यंत्रणा, साऊंड सिस्टीम, मेकअप रुम्स, व्हीआयपी रुम्स चांगल्या अवस्थेत आहेत. इथे पार्किंगसाठी नेहमीच जागेची कमतरता भासते.

सोशल सर्व्हिस लीगच्या व्यवस्थापकीय समितीने दामोदर नाट्यगृहाची पुर्नबांधणी करण्याची योजना आखली आहे. भविष्यातील गरज ओळखून प्रशस्त नाट्यगृह रसिकांच्या सेवेत रुजू करण्याचे प्लॅनिंग सध्या सुरू आहे. यासाठी ऑक्टोबरपर्यंतच हॅालचे बुकींग सुरू ठेवण्याच्या सूचना व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत. दामोदर हॅालमधून बाहेर पडण्याचा मार्ग असलेल्या जुन्या चाळीसह आजूबाजूचा बराच भाग डेव्हलप करण्यात येणार आहे. नाट्यगृह सध्या असलेल्या जागेवरून कदाचित दुसरीकडे हलवून लालबागच्या दिशेला असलेल्या गल्लीजवळ उभारण्यात येईल. त्यामुळे बाजूच्या गल्लीतून एंट्री मिळेल आणि वाहतूक कोंडीपासून सुटका होईल. ऑक्टोबर महिन्यात पाच दिवस शतक महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर दामोदर नाट्यगृह पुर्नबांधणीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

  • इतिहास :

 

मुंबईतील सर्वात जुने नाट्यगृह अशी दामोदर नाट्यगृहाची ओळख आहे. १९११ मध्ये 'दि सोशल सर्व्हिस लीग'ची स्थापना करण्यात आली. कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांची कला रसिकांपर्यंत पोहोचवी या उद्देशाने सोशल सर्व्हिस लीगने १९२२ मध्ये दामोदर नाट्यगृहाची उभारणी केली. या नाट्यगृहाची आसनक्षमता ७३३ आहे. मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी आणि मालिका विश्वात आघाडीवर असणाऱ्या आघाडीच्या सर्वच कलाकारांनी इथे आपली कला सादर केली आहे. शनिवार-रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी इथे नाटकांचे शो असतात. इतर दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नाट्यगृह उपलब्ध असते. रिहर्सल हॅालही आहे.

- भरत जाधव (अभिनेता)

माझ्या करिअरची सुरुवातच दामोदरपासून झाली. एकांकिका स्पर्धा, लोककलादर्पणचा कार्यक्रम, नाटकं असं बरंच काही इथे केलं आहे. सोशल सर्व्हिस लीगने हे नाट्यगृह खूप चांगलं मेंटेन केलं आहे. आतही काळानुरूप बदल केले आहेत. सर्व सोयीसुविधा असल्या तरी नाटकांचे प्रयोग कमी होतात, पण मी माझ्या नाटकांचे एक-दीड महिन्याने प्रयोग करतो. इथे पूर्वी खूप नाटकं पाहिली. स्पर्धांमध्ये सहभागी झालो. बऱ्याच एकांकीका स्पर्धा केल्या. आमच्यासाठी पहिलं दामोदर आणि मग शिवाजी मंदिर होतं. त्यावेळी आम्ही गल्लीबोळातही काही स्कीट्स करायचो. त्यामुळे दामोदरसारख्या थिएटरमध्ये शो करणे ही तेव्हा खूप मोठी गोष्ट होती. आता अमेरिका-लंडनमध्ये प्रयोग करतो, पण सुरुवात दामोदरपासून झाली हे विसरता येणार नाही.

- संजय नार्वेकर (अभिनेता)

अलिकडच्या काळात माझं दामोदरला जाणं झालेलं नाही. लालबाग-परळमधील कामगारांना आपली कला सादर करता यावी यासाठी दामोदर नाट्यगृह उभारण्यात आलं. कामगार चळवळ सुरू झाली, तेव्हा त्यांना आपले कार्यक्रम इथे करता यावेत असाही एक हेतू होता. दामोदर नाट्यगृहामुळे दि सोशल सर्व्हिस लीगचे हेतू काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत. इथे नेहमीच प्रयोग होतात आणि चांगले रंगतात. नाट्यरसिकही खूप आपुलकीनं नाटक पहायला येतात. त्यामुळे काम करायला मजा येते. रंगमंचावर सेट नेणं सोपं जातं. पार्किंगची समस्या आहे. कारण चार-पाचच गाड्या पार्क करण्याची सोय आहे.
 

Web Title: special article me natyagruha boltoy Damodar natyagruha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.