Special article: गेले प्रेक्षक कुणीकडे? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 02:07 PM2022-07-31T14:07:21+5:302022-07-31T14:08:06+5:30

Movies: मनोरंजन विश्वाला कोडे सुटेना!

special article on entertainment industry and Theater | Special article: गेले प्रेक्षक कुणीकडे? 

Special article: गेले प्रेक्षक कुणीकडे? 

googlenewsNext

संजय घावरे
 

जानेवारीपासून सुरळीत सुरू असलेली मनोरंजन विश्वाची गाडी अचानक ट्रॅकवरून घसरली आहे. जून महिना सुरू झाल्यापासून मनोरंजन विश्वाला जणू ग्रहण लागले आहे. बड्या कलाकारांचे बहुप्रतिक्षीत सिनेमेही बॉक्स ऑफिसवर आपटत आहेत. यात हिंदी-मराठी चित्रपटांसोबतच मराठी नाटकांचाही समावेश आहे. समीक्षकांनी नावाजलेले आणि चांगले रेटिंग मिळालेले सिनेमेही बॉक्स ऑफिसवर टिकाव धरू न शकल्याने गेले प्रेक्षक कुणीकडे? हा प्रश्न मनोरंजन विश्वाला सतावू लागला आहे.

मराठीमध्ये 'झोंबिवली' आणि हिंदीत 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमांनी वर्षाच्या सुरुवातीच्या काळात चांगला बिझनेस करत सिनेसृष्टीला शुभशकून दिला. त्यानंतर हिंदीत 'द कश्मिर फाईल्स'ने अनपेक्षितपणे धडाकेबाज व्यवसाय करत कौतुकाची थापही मिळवली. दुसरीकडे 'आरआरआर' आणि 'केजीएफ २' या दक्षिणात्य सिनेमांनी हिंदीलाही मागे टाकत खोऱ्याने पैसे कमावले. मराठीमध्ये 'पावनखिंड', 'मी वसंतराव', 'शेर शिवराज', 'धर्मवीर', 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटांनी चांगली कमाई करत हिंदी सिनेसृष्टीचेही लक्ष वेधून घेतले. एकीकडे मराठी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा आकडा हिंदीपेक्षा मोठा होता, पण हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या सिनेमांनी व्यवसाय केला होता. 'सरसेनापती हंबीरराव'नंतर मराठीची गाडी जी थांबली ती सुरू व्हायचे नावच घ्यायला तयार नाही. जून-जुलैमध्ये जवळपास १८ मराठी चित्रपट रिलीज झाले, पण प्रेक्षकांअभावी फ्लॅाप झाले. हिंदीतही 'भुलभुलैया २'नंतर कोणत्याही चित्रपटाने चांगला व्यवसाय केला नाही. 'जुगजुग जिओ'ने हळूहळू का होईना बिझनेस केला. 'सम्राट पृथ्वीराज', 'मेजर', 'शाबाश मिथू' या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. 'रॅाकेट्री'चे सर्वांनी कौतुक केले, पण बिझनेस फक्त २०.४७ कोटी रुपयांचा झाला. या जोडीला 'शमशेरा'ने पहिल्या आठवड्यात ४०.४५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. मराठीत 'फनरल', 'मीडियम स्पायसी', 'वाय', 'ये रे ये रे पावसा', 'तमाशा LIVE' आणि 'अनन्या'ची स्तुती झाली, पण सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक आलेच नाहीत. या आठवड्यात रिलीज झालेल्या 'टाईमपास ३'लाही धडाकेबाज ओपनिंग मिळू शकलेले नाही.

मराठी नाटकांचीही अवस्थाही सिनेमांपेक्षा वेगळी नाही. भरत जाधव आणि प्रशांत दामलेंसारख्या आघाडीच्या कलाकारांची नाटके वगळता इतर नाटकांना शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही रसिक गर्दी करत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा निर्मात्यांचा प्रयोगाचा खर्चही निघत नाही. काही दर्जेदार नाटकांनाही बुकींग मिळत नसल्याने प्रयोग कसे करायचे हा प्रश्न निर्मात्यांना सतावत आहे. आज सरासरी सर्वच नाटकांना ५० टक्के किंवा त्याहीपेक्षा कमी बुकींग मिळत आहे. यात ऑनलाईन बुकींगचे प्रमाण अधिक असून, करंट बुकींग फार कमी होत आहे. आज जवळपास वीसपेक्षाही अधिक व्यावसायिक नाटके मराठी रंगभूमीवर आहेत, पण प्रशांत-भरत यांच्या नाटकांखेरीज कोणाच्याही प्रयोगाला 'हाऊसफुल'चा फलक झळकत नाही.

जूनपासून प्रेक्षक सिनेमागृहांकडे फिरकत नसल्याची काही कारणे असल्याची जाणकारांना जाणवतात. जून महिना आला की मुख्यत: शाळेची फी, वह्या-पुस्तके, ट्युशन फी, युनिफॅार्म, पावसाळी साधनांचा खर्च वाढतो. त्यामुळे सर्वसामान्यांची दमछाक होते. अशा परिस्थितीत मनोरंजनाला बगल दिली जाते. जूनपासून मान्सूनही सक्रिय होतो. पावसाचे प्रमाण खूप असणाऱ्या ठिकाणी सिनेमांच्या व्यवसायाला खीळ बसते. बरेच जण पिकनिक मूडमध्ये असल्याने मनोरंजनावरील खर्च तिकडे वळवला जातो. याखेरीज तिसरे मुख्य कारण म्हणजे फिल्ममेकर जेव्हा प्रेक्षकांना आवडणारा कंटेंट देत नाहीत तेव्हा प्रेक्षक सिनेमागृहात येत नाहीत. या जोडीला आज ओटीटी हा कमी खर्चातील पर्यायही प्रेक्षकांकडे आहे. त्यामुळेही प्रेक्षकांची संख्या रोडावली आहे.

जानेवारीपासून आतापर्यंत रिलीज झालेले मराठी सिनेमे -६३

जानेवारीपासून आतापर्यंत रिलीज झालेले हिंदी सिनेमे -३४

जूनपर्यंतचा हिंदी सिनेमांचा बिझनेस अंदाजे -५००० कोटी रुपये

जूनपर्यंत मराठी सिनेमांचा बिझनेस अंदाजे -९० ते १०० कोटी रुपये

पावनखिंड - ३८ कोटी (१० आठवडे)

सरसेनापती हंबीरराव - १७ कोटी (८ आठवडे)

धर्मवीर - ३८ कोटी (७ आठवडे)

शेर शिवराज - १४ कोटी (५ आठवडे)

गंगूबाई काठीयावाडी - २०६.६५ कोटी

द कश्मिर फाईल्स - ३४०.९२ कोटी

आरआरआर - १२०० कोटी

केजीएफ २ - १२५० कोटी

भुलभुलैया २ - २६६.८८ कोटी

"गटातटाचे राजकारण सुरू असल्याचा धक्का मराठी नाटकांना बसत आहे. याशिवाय शाळा सुरू झाल्याने मुलांसोबत आई-वडीलही अभ्यासक्रम पूर्ण करण्यात बिझी झाले आहेत. आज गाजलेल्या नाटकांनाही अॅव्हरेज बुकींग मिळत आहे. नुकत्याच झालेल्या 'हिच तर फॅमिलीची गंमत'ला ५० टक्के बुकींग होते. नाटकांची आवड असलेले निर्माते असल्याने आज मराठी नाटक टिकून आहे. चांगला प्रतिसाद मिळत नसला तरी खचून न जाता धाडसाने येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जात आहेत. नवनवीन प्रयोग करत आहेत. प्रशांत आणि भरतसारखे नट असल्याने आजही मराठी रसिक रंगभूमीकडे वळत आहेत." -  गोट्या सावंत (नाट्य सूत्रधार)

"प्रेक्षक न येण्यामागे पाऊस हे कारण सर्व ठिकाणी असू शकत नाही. यामागे बरीच कारणे आहेत. योग्य पब्लिसिटी न केली जाणे, कंटेंट चांगला नसणे, रिव्ह्यूज चांगले न येणे ही कारणे प्रमख कारणे असू शकतात. जानेवारीपासून जूनपर्यंत सिनेमे खूप चांगला बिझनेस करत होते. यात इंग्रजी चित्रपटही चालले. काही मराठी चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला, पण जूनपासून प्रेक्षक दुरावले आहेत. हिंदीत सध्या प्रेक्षकांना योग्य कंटेंट मिळत नसल्याचे जाणवत आहे. ओटीटीचीही सवय लागली आहे. कंटेंट चांगला मिळाला तर प्रेक्षक नक्कीच परततील."  - मुरली चटवाणी (मॅनेजिंग पार्टनर, पॅनोरमा स्टुडिओज - डिस्ट्रीब्युशन)
 

Web Title: special article on entertainment industry and Theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.