मराठी चित्रपटांसाठी केवळ एकच चित्रपटगृह सुरू?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 03:14 PM2022-07-24T15:14:35+5:302022-07-24T15:15:50+5:30

Marathi movie: पूर्वी महाराष्ट्रात जवळपास १२०० सिंगल स्क्रीन थिएटर्स होती. गावोगावच्या प्रेक्षकांसाठी ६०० ते ७०० टुरिंग टॅाकीज होत्या. आज मराठी चित्रपटांसाठी केवळ एक चित्रपटगृह सुरू आहे.

special article only one theater for Marathi movie | मराठी चित्रपटांसाठी केवळ एकच चित्रपटगृह सुरू?

मराठी चित्रपटांसाठी केवळ एकच चित्रपटगृह सुरू?

googlenewsNext

संजय घावरे

'मराठी राज्यातही हाल सोसते मराठी...' असेच काहीसे चित्र सध्या महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. दक्षिणेमध्ये दक्षिणात्य चित्रपटांसाठी विशेष चित्रपटगृहे असून, तिथे हिंदीलाही थारा दिला जात नाही. महाराष्ट्रातील वास्तव मात्र याच्या अगदी विरुद्ध आहे. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना वाहिलेली पाच मुख्य चित्रपटगृहे होती, पण आज त्यातील केवळ एकच सुरू आहे.

१९९८ मध्ये भारतात आलेल्या मल्टिप्लेक्सने शिस्तबद्ध मार्केटिंग आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपूर्ण देश काबीज केला आहे. या व्यावसायिक शर्यतीत काळानुरूप बदल न घडवू शकलेली एक पडदा चित्रपटगृहे मागे पडली. आज एक पडदा चित्रपटगृहांची अवस्था बिकट आहे. त्यातच कोरोनाचा फटका बसल्याने बरीच चित्रपटगृहे बंद असून, सुरू असलेल्या चित्रपटगृहांनाही घरघर लागली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात फक्त मराठी चित्रपट दाखवणारे एकच चित्रपटगृह सुरू आहे. इतर चित्रपटगृहे सुरू होणार की नाहीत याचे उत्तर कोणाकडेही नाही. महाराष्ट्रासारख्या मराठमोळ्या राज्यामध्ये हिंदीसह इतर चित्रपटांसाठी शेकडो चित्रपटगृहे आहेत, पण मराठी चित्रपटांसाठी हक्काची हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी पाच चित्रपटगृहे होती. मुंबईत भारतमाता, पुण्यात प्रभात, कोल्हापूरात शाहू, नाशिकमध्ये विजयानंद आणि लातूरमध्ये यशोदा या सिनेमागृहांमध्ये केवळ मराठी चित्रपट दाखवले जायचे. यापैकी केवळ शाहू हे एकमेव थिएटर सध्या सुरू आहे. प्रभात आणि यशोदा बंद झाली आहेत. भारतमाता आणि विजयानंद ही दोन सिनेमागृहे दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आहेत. ती सुरू होण्याच्या प्रतीक्षेत सिनेसृष्टी आणि प्रेक्षक आहेत.

पूर्वी महाराष्ट्रात जवळपास १२०० सिंगल स्क्रीन थिएटर्स होती. गावोगावच्या प्रेक्षकांसाठी ६०० ते ७०० टुरिंग टॅाकीज होत्या. आज मराठी चित्रपटांसाठी केवळ एक चित्रपटगृह सुरू आहे. माटुंग्यातील अरोरा चित्रपटगृहामध्ये दक्षिणात्य चित्रपट प्रामुख्याने दाखवले जातात. कलाकारांचे मोठे कटआऊटस लावून दुधाने आंघोळ घातली जाते. सरकारने हात वर केले... कोरोना काळातही प्रॅापर्टी टॅक्स, होर्डिंग लायसन्स फी, सिनेमा लायसन्स फी माफ केले नाहीत. वीज न वापरता पूर्ण बिल भरावे लागले. कर्मचाऱ्यांना पगार द्यावा लागला. जीएसटीचे पैसे अडवून ठेवण्यात आले.

पूर्वीच्या काळी बरेच मराठी निर्माते आपल्या चित्रपटाच्या मुहूर्ताचा नारळ भारतमाता सिनेमागृहाचे मालक बाबासाहेब भोपटकर यांच्या हस्ते वाढवायचे. बाबासाहेबांच्या हस्ते श्रीफळ वाढवलेल्या बऱ्याच मराठी चित्रपटांनी तिकिटबारीवर भरघोस यश मिळवत रसिकांच्या मनातही राज्य केल्याचा अनुभव बऱ्याच निर्मात्यांना आला होता.

आजही एक पडदा सिनेमागृहे काळानुरूप बदल करायला तयार नाहीत. बऱ्याचशा एक पडदा चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहताना काळोख जाणवतो. मल्टिप्लेक्सप्रमाणे १०० टक्के ब्राईटनेसमध्ये सिनेमा पहायला मिळत नाही. साऊंड सिस्टीम जुनीच असल्याने कलाकारांचा आवाज आणि संगीताखेरीज येणारे लहान-सहान आवाज ऐकू येत नाहीत.

याला जबाबदार कोण?

मराठीला वाहिलेली एक पडदा चित्रपटगृहे बंद पडण्यामागे बरीच कारणे आहेत. आज मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या मल्टीप्लेक्समध्ये जास्त पैसे खर्च करून सिनेमा बघण्याची सवय प्रेक्षकांना लागली आहे. मल्टिप्लेक्ससोबत शर्यतीत धावण्यासाठी एक पडदा चित्रपटगृहांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला नाही. आरामदायक आसनव्यवस्था, अद्ययावत वातानुकूलीत यंत्रणा, डॉल्बी अॅटमॉसचा समावेश, योग्य मार्केटींग आणि इतर सोयीसुविधा पुरवण्यात सिंगल स्क्रीन थिएटर्स कमी पडली. मल्टीप्लेक्समध्ये ठराविक अंतराने शो दाखवले जातात. एक पडदा चित्रपटगृहांमध्ये मात्र शो चुकल्यावर तो संपेपर्यंत वाट पहावी लागते.

...ते वातावरणच हरवले

केवळ मराठी चित्रपटांसाठी असलेल्या चित्रपटगृहांमध्ये पूर्वी सिल्व्हर ज्युबली-गोल्डन ज्युबली आठवड्यांचे सेलिब्रेशन केले जायचे. आघाडीचे कलाकार प्रीमियरसाठी गर्दी करायचे. काही कलाकार स्वत: तिकीट खिडकीवर उभे राहून तिकीटे विकायचे. त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्याकडून तिकीट खरेदी करण्यासाठी प्रेक्षक गर्दी करायचे. भारतमातामध्ये पुन: पुन्हा लागणाऱ्या दादा कोंडकेंच्या चित्रपटांसाठीही कायम गर्दी व्हायची.

एक पडदा सिनेमागृहांची परंपरा

गिरगावातील मॅजेस्टीक १९७२मध्ये बंद झाले. सेंट्रलमध्ये मराठी-हिंदी सिनेमे लागायचे. मॅजेस्टिक बंद झाल्यावर रॉक्सीला मराठीचा मॅटिनी शो लागायचा. भारतमाता, प्लाझा, कोहिनूर, चित्रा, शारदा ही मुंबईतील हुकूमी थिएटर्स मानली जायची. विले पार्ल्यात श्याम, चेंबूरमध्ये शरद, गोरेगावमध्ये टोपीवाला, सायनमध्ये रुपम, पुण्यात प्रभात, अलका, भानुविलास, विजय आहे. यापैकी अलका सुरू आहे. पूर्वी मराठी लोकांचे पॉकेट पाहून चित्रपट रिलीज केले जायचे. आज मराठी लोकसंख्या असलेल्या ठिकाणीही मराठी चित्रपट रिलीज होत असल्यानेही प्रेक्षक येत नाहीत.

"घाटकोपरमधील उदय आणि कराडमधील नटराज ही माझी दोन थिएटर्स बंद आहेत. सिनेमांचे माध्यमांतर झाल्याने प्रेक्षकांची संख्या घटू लागली. प्रेक्षक कमी आणि महागाई वाढूनही तिकीटांचे दर वाढवता आले नाहीत. दर वाढवल्यावर आणखी प्रेक्षक कमी होण्याची भीती होती. यासाठी सरकारकडे टॅक्सेस कमी करण्याची मागणी केली, पण सिंगल स्क्रीन थिएटर्स जगावीत असे सरकारला वाटत नव्हते. मल्टिप्लेक्स आल्यावर पाच वर्षे मनोरंजन टॅक्स फ्री होती. आमच्याकडून मात्र सर्व कर वसूल करण्यात आले. आम्हाला थिएटरखेरीज दुसरा कोणताही उद्योग करण्याची परवानगी नसल्याने प्रॅापर्टीही डेव्हलप करू शकत नाही. मल्टिप्लेक्सच्या शर्यतीत जी सिंगल स्क्रीन थिएटर्स तग धरू शकत नाहीत त्यांना एक तर सरकारने मदत करावी किंवा दुसरा व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी," - नितीन दातार (अध्यक्ष - सिनेमा ओनर्स अँड एक्झीबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया)

"कोरोना येण्यापूर्वीच आम्ही भारतमाताच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले होते. त्यानंतर कोरोना आणि लॉकडाऊन झाल्याने काम पूर्णपणे ठप्प झाले. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतरही सिनेमागृहांना परवानगी नसल्याने आणि काही अडचणी आल्याने नूतनीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. भारतमाता लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. भारतमाता हे मुंबईतील मराठी चित्रपटांसाठी असलेले महत्त्वाचे सिनेमागृह असल्याने नेहमीच सिनेसृष्टीमधील दिग्गजांकडून थिएटर सुरू होण्याबाबत विचारणा करण्यात येते, पण काम पूर्ण झाल्यानंतरच थिएटर सुरू करण्यात येणार आहे", - कपिल भोपटकर (मालक, भारतमाता सिनेमागृह)

Web Title: special article only one theater for Marathi movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.