सफाई कामगारांच्या मदतीसाठी सरसवला भाऊ, देणार हे सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 04:41 PM2019-01-09T16:41:25+5:302019-01-09T17:14:01+5:30
भाऊ कदम यांचा 'नशीबवान' हा चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात भाऊ हे बी. एम. सी. च्या सफाई कामगारांची भूमिका निभावत आहेत.
भाऊ कदम यांचा 'नशीबवान' हा चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात भाऊ हे बी. एम. सी. च्या सफाई कामगारांची भूमिका निभावत आहेत. या भूमिकेसाठी भाऊ कदम यांनी काही खास तयारी केली होती. जेणेकरून ते निभावत असलेली भूमिका कुठेही कमजोर पडू नये, खोटी वाटू नये यासाठी भाऊंनी विशेष मेहनत घेतली होती. या भूमिकेसाठी भाऊंनी खरा बी. एम. सी. कामगाराचा गणवेश परिधान केला होता. सफाई कामगारासारखं वागणं, बोलणं, त्यांची देहबोली या सर्व गोष्टी भाऊ कदम यांनी अगदी लीलया पेलल्या. भूमिका खरी वाटावी म्हणून भाऊंनी खरोखर कचरा उचलला, रस्ते झाडून स्वच्छ केले. सफाई कामगारांचं आयुष्य, या कामगारांचं खडतर जीवन, समाजाकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक हे सर्व भाऊ कदम यांनी अगदी जवळून पाहिल आणि अनुभवलं. या लोकांच्या परिवाराला सुद्धा तितकीच वाईट वागणूक मिळते. पण या सर्व गोष्टी बाजूला सारून भाऊ कदम हे या कामगारासोबत जेवायला बसायचे, फावल्या वेळात त्यांच्या सोबत गप्पा मारायचे, भूमिकेसाठी आणखी काय सुधारणा आवश्यक आहे यावर चर्चा करायचे. या सफाई कामगार आणि त्यांच्या संपूर्ण परिवारासाठी 'नशीबवान' चित्रपटाचा एक 'स्पेशल शो' लॅन्डमार्क फिल्म्स तर्फे आयोजित केला जाणार आहे. हा शो १३ जानेवारीला रविवारी होईल. या शो साठी भाऊ कदम स्वतः उपस्थित राहणार आहे. या सर्व सफाई कामगारांसोबत बसून ते सुद्धा चित्रपटाचा आनंद घेणार आहेत. "आपणच पसरवलेला कचरा हे सर्व लोक साफ करतात. आपल्याला घर साफ करायला लावले तर किती कंटाळा येतो, पण हे लोक न थकता, न कंटाळता दुसऱ्याचा कचरा साफ करता. असे असूनही आपणच या कामगारांचा तिरस्कार करतो, त्यांना कमी लेखतो, त्यांना पाहून नाक बंद करतो. असे का? हि परिस्थिती मी एकटाच बदलू नाही शकत पण हा मी त्या दिशेने पाऊल टाकले आहे. माझ्याकडून शक्य तेवढी मदत मी या लोकांना करणार आहे." असे भाऊ कदम यांनी स्पष्ट केले.
लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती असलेला, फ्लाईंग गॉड फिल्म्स आणि गिरी मीडिया फॅक्टरी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले असून, अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील यांनी निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे सहनिर्माते असणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना मिताली जगताप–वराडकर, नेहा जोशी, राजेश शृंगारपुरे, अतुल आगलावे या कलाकाराचा देखील दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे. 'नशीबवान' हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे.