झांसीमधील चित्रपटाचे चित्रीकरण आटपल्यानंतर स्पृहा जोशी करणार हे पहिले काम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:02 PM2019-04-17T16:02:20+5:302019-04-17T16:27:31+5:30
स्पृहाने गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्पृहाने आज एक अभिनेत्री, गीतकार म्हणून स्वतःचे नाव कमावले आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या झांसीमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. मात्र हे चित्रीकरण या आठवड्याअखेरीस आटोपून ती लवकरच परतणार आहे आणि पाणी फाऊंडेशनच्या श्रमदानात आमिर खान आणि इतर मराठी कलाकारांसह सहभागी होणार आहे. स्पृहा जोशी गेल्यावर्षी पुरंदर तालुक्यातल्या पोखर या गावात श्रमदानासाठी गेली होती. श्रमदानाशिवायही पाणी फाऊंडेशनच्या वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांना स्पृहा सक्रिय सहभागी होती.
अभिनेत्री स्पृहा जोशी 1 मे रोजी श्रमदानासाठी जाणार आहे. ती गेल्यावर्षीच्या अनुभवाविषयी सांगते, “मुंबई-पुण्यातल्या सुखवस्तू आयुष्याच्या बाहेर भयावह परिस्थितीत पाण्यासाठी वणवण करणाऱ्या लोकांचे आयुष्य पाणी फाऊंडेशनच्या मोहिमेमुळे मला जवळून पाहायला मिळाले. पाणी फाऊंडेशनसोबत दुष्काळाशी दोन हात करताना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन संघटित होणारे, एकमेकांमधले पिढ्यान् पिढ्यांचे मतभेद विसरून, एकत्र पंगतीला बसणारे गावकरी मी पाहिलेत. मोठ्या शहरात राहणारी सुखवस्तू कुटूंबातली उच्चशिक्षित मुलं, गावात येऊन कुदळ-फावडे घेऊन उन्हात घाम गाळताना पाहताना एक सुखद अनुभव मिळतो.”
स्पृहा पुढे सांगते, “पाणी फाऊंडेशनची मोहीम आता चळवळ झालीय. पाणी फाऊंडेशनसाठी काम करताना नैसर्गिक आपत्तीवर आपण मात करण्याचा आनंद गावकरऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. या आनंदात मीही सहभागी होणार असल्याचे समाधान काही आगळेच असते. गेल्यावर्षी मी एकटीच श्रमदानासाठी गेले होते. पण यंदा मी माझ्या आई आणि काकूसोबत श्रमदानात सहभागी होणार आहे.”
स्पृहाने गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्पृहाने आज एक अभिनेत्री, गीतकार म्हणून स्वतःचे नाव कमावले आहे. तिने दे धमाल या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली. या सगळ्याच मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. या मालिकेतील तिच्या भूमिकांची नाव देखील आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहेत. तसेच समुद्र, डोण्ट वरी बी हॅपी यांसारख्या नाटकातून तिने तिची अभिनयक्षमता दाखवून दिली. पैसा पैसा, मोरया, जाऊ द्या ना बाळासाहेब, बायोस्कोप, अ पेइंग गेस्ट यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या.