डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त,महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 11:33 AM2019-04-19T11:33:19+5:302019-04-19T11:34:46+5:30

जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशीक, सोलापूर, बेळगाव, गोवा इत्यादी ठिकाणी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे.

Statewide Programs on The Occasion of Classical Vocalist Dr Vasantrao Deshpande Birth Centenary | डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त,महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त,महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

googlenewsNext

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महान गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते, ज्यांनी आपल्या अद्वितीय, अविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले ते डॉ. वसंतराव देशपांडे.  ज्यांनी बंदिश, ठुमरी, नाट्यसंगीत, चित्रपट संगीत या सर्व गान प्रकारांवर आपल्या गायकीचा अमीट ठसा उमटवला. असे आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व डॉ वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष दि. ०२ मे २०१९ पासून सुरु होत आहे. त्यांचे पट्टशिष्य पं. चंद्रकांत लिमये यांचं संगीत क्षेत्रातलं कार्य आणि गुरु प्रेम सर्वांना परिचित आहे. त्यांनी या निमित्तानं दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन केले नसते तरच नवल.


डॉ. वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य पं.चंद्रकांत लिमये यांनी २००० साली वसंतराव देशपांडे संगीत सभेची स्थापना केली. वसंतरावांची गायकी, लय-सुरांवरचं प्रभुत्व, गाण्यातला शास्त्रशुद्धपणा, आवाजातला गोडवा, श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची ताकद हा समृद्ध वारसा पुढे अविरत सुरू रहावा हा या संगीत सभेचा मूळ उद्देश. तो पं. लिमये यांनी मनोभावे जपला. ही परंपरा पुढे नेण्यासाठी आणि वसंतरावांच्या कर्तृत्वाचे पुण्यसमरण करण्याच्या हेतूने पं. लिमये यांनी जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केले आहे.

डॉ. वसंतराव देशपांडे संगीत सभेचे प्रमुख विश्वस्त पं. चंद्रकांत लिमये असून संगीत सभेने दि. ५ मे २०१९ रोजी वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवच्या शुभारंभाचा सोहळा रविंद्र नाट्य मंदीर येथे संध्याकाळी ५ ते रात्रौ १० या वेळेत आयोजित केला आहे. या दिवशी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी श्री. अच्युत गोडबोले, पं. शंकर अभ्यंकर, पं. सत्यशील देशपांडे, श्रीमती फैयाज, माजी पोलीस आयुक्त अरविंद इनामदार, माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून ते डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी जागृत करणार आहेत.

यानंतर 'वसंत बहार' हा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. दृकश्राव्य माध्यमातुन उलगडणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदीशी, ठुमरी, नाट्यगीत, चित्रपटगीत, इत्यादी गीतप्रकार पं. चंद्रकांत लिमये आपल्या गुरुकुलातील शिष्यांसह सादर करणार आहेत. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या तरुण गायिका श्रीमती नुपूर काशीद- गाडगीळ व पद्मभूषण पंडिता प्रभाताई अत्रे यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम जन्मशताब्दी निमित्त सर्व रसिकांसाठी विनामुल्य ठेवला आहे.

जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशीक, सोलापूर, बेळगाव, गोवा इत्यादी ठिकाणी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे.
 

Web Title: Statewide Programs on The Occasion of Classical Vocalist Dr Vasantrao Deshpande Birth Centenary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.