होशियार रहा....दोन कोटी घेऊन ‘तो’ आज महाराष्ट्रात येतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 11:23 AM2017-12-27T11:23:16+5:302017-12-29T11:42:00+5:30
गेली महिनाभर चित्रपटाच्या शुटींगच्या सेटवरून दोन कोटी रूपये असलेली एक ट्रंक घेऊन फरार झालेल्या चोराची सर्वत्र जोरदार चर्चा ...
गेली महिनाभर चित्रपटाच्या शुटींगच्या सेटवरून दोन कोटी रूपये असलेली एक ट्रंक घेऊन फरार झालेल्या चोराची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. कधी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर, तर कधी बैलगाडीतून त्या ट्रंकेसह फिरणाऱ्या त्या चोराची अनेक छायाचित्र महाराष्ट्राभर झळकली आहेत. त्या चोराचे नाव चरण चंद्रकांत मोरे असून तो मूळचा चिपळूणचा आहे. सुत्रांच्या विश्वसनीय माहितीनुसार, आज 'तो' चोर महाराष्ट्रात दाखल होतोय. हो! आम्ही आज प्रदर्शित होणाऱ्या चरणदास चोर या चित्रपटाबाबत बोलतोय. ऋषिकेश मुखर्जी आणि बासू चटर्जी सारख्या सिनेकर्मींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदी टीव्ही मालिका विश्वातील एक अग्रगण्य लेखक-दिग्दर्शक आणि एम. एस. धोनी या चित्रपटाचे सहलेखक श्याम माहेश्वरी आजच्या काळातील साध्यासरळ माणसाची गोष्ट सात्विक-सकस विनोदी पद्धतीने प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत.
चरण चंद्रकांत मोरे या साध्या व गरीब स्वभावाच्या चाकरमान्याची ही गोष्ट आहे. मालकाने कचेरीतून एक पत्र्याची पेटी आणायला सांगितली असते. अपघाताने चरण ती पेटी घेऊन पसार होतो. कारण त्या पेटीत आहेत रोख दोन कोटी रुपये. आता हे घबाड लपविण्याच्या नादात चरणचा झालेला रोलर कोस्टर प्रवास, प्रवासादरम्यान भेटलेली नाना तऱ्हेची माणसे. पेटीच्या लपवाछपवी उडालेला गोंधळ. पदोपदी वाढत जाणारे संकट आणि संकटातून बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा चरण...असा हा एकूण मामला सहज सोप्या विनोदी शैलीतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता आणि ज्येष्ठ दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या सहवासात राहून काम केलेल्या श्याम महेश्वरी यांनी चरणदास चोर साकारताना निरिक्षण आणि अनुभवातून मिळालेल्या सिनेतंत्राच्या शिदोरीचा मोठ्या कल्पकतेने वापर केला आहे. आणि त्याला क्रीएटीव्ह दिग्दर्शक संजू होलमुखे यांची जोड मिळाली आहे. सोलापूर-बार्शीचा नाट्यकलावंत अभय चव्हाण या हरहुन्नरी कलावंताने चरणची भूमिका वठवली आहे. सोबतीला मुकूंद वचुले, सोनम पवार, अनुया बैचे, आणि बालकलाकार आदेश आवारे आहेत.
गेल्या काही दिवसापासून या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि ट्रंकसोबतचे फोटोज् सोशल मिडीया वरून वायरल झाले होते. या ट्रंकमध्ये नेमकं काय आहे? याचे उत्तर आज मिळालेच असेल पण ती अशी इथे-तिथे का पडलेली होती? साध्याभोळ्या चरणने ती का चोरली असेल? पुढे त्या पेटीचे आणि चरणचे काय होते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि चरणदास चोर चा रंगतदार, खुमासदार प्रवास पाहाण्यासाठी आज सिनेमागृहात जायलाच हवे.