‘लव्ह यु जिंदगी’ची कथा आवडली-निर्माते सचिन बामगुडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:00 PM2019-01-01T21:00:00+5:302019-01-01T21:00:02+5:30
जेव्हा पण आपल्याला कोणी काका किंवा अंकल म्हणून बोलावतो ना तेव्हा ते ऐकणं नकोसं वाटतं. ३५ वर्षे झालेल्या पुरुषांना काका म्हटलेले अजिबात आवडत नाही. ती एक फिलिंग असते ना. जेव्हा मी या चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा कळलं की, यामध्ये दोन ट्विस्ट आहेत त्यामुळे ही खूप चांगली स्क्रिप्ट आहे.
सचिन पिळगांवकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला आणि ‘आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयाची मर्यादा नसते, असा संदेश देणारा ‘लव्ह यु जिंदगी’ हा मराठी चित्रपट ११ जानेवारी २०१९ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. एस. पी. प्रोडक्शन प्रस्तुत आणि सचिन बामगुडे निर्मित 'लव्ह यु जिंदगी' चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने लोकमतने निर्माते सचिन बामगुडे यांच्यासोबत केलेली ही खास बातचीत-
वाढत्या वयाला न स्विकारणाऱ्या आणि त्याविषयी तक्रार करणाऱ्या अनिरुध्द दाते यांची कथा म्हणजे ‘लव्ह यु जिंदगी’. निर्माते म्हणून या चित्रपटाची कथा ऐकताच निर्मितीसाठी होकार दिला. याविषयी त्यांना विचारले असता म्हणाले,‘माझं पण इतकं फारसं वय नाही झालंय. पण कसं असतं ना, जेव्हा पण आपल्याला कोणी काका किंवा अंकल म्हणून बोलावतो ना तेव्हा ते ऐकणं नकोसं वाटतं. ३५ वर्षे झालेल्या पुरुषांना काका म्हटलेले अजिबात आवडत नाही. ती एक फिलिंग असते ना. जेव्हा मी या चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा कळलं की, यामध्ये दोन ट्विस्ट आहेत त्यामुळे ही खूप चांगली स्क्रिप्ट आहे आणि यावर चित्रपट पण खूप चांगला बनू शकतो असा माझा विश्वास बसला. म्हणून या चित्रपटाची निर्मिती करायचे मी ठरवले अन् ते देखील केवळ १० मिनिटांत मी माझा होकार कळवला.’
तुम्ही निर्मित करत असलेल्या चित्रपटात सचिन पिळगांवकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे हे तिन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या स्टारकास्टसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? हे विचारले असता ते म्हणतात,‘ खूपच छान अनुभव होता. सुरुवातीला या चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज सावंत जेव्हा स्क्रिप्ट घेऊन माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला सचिनजींना भेटायचंय. सचिनजींना भेटलो आणि त्यांना दिग्दर्शनाच्या बाबतीत अनेक अनुभव आहेत. खरं तर ते ऑलराऊंडर आहेत त्यामुळे या चित्रपटाशी संबंधित त्यांचं मत मला जाणून घ्यायचं होतं. प्रार्थनाविषयी बोलायचं तर, या भूमिकेसाठी अनेक चेहऱ्यांचा विचार करण्यात आला होता पण प्रार्थनाच या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकते असं आम्हांला वाटलं. कविताजी तर या भूमिकेला एकदम परफेक्ट आहेत. ‘एका लग्नाची गोष्ट’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकांत त्यांनी उत्तम केलंय आणि हे नाटक फॅमिली ऑडियन्ससाठी आहे. त्यामुळे फॅमिली एंटरटेनमेंट असलेल्या चित्रपटात आणि त्यातील भूमिकेत कविताजीच परफेक्ट होत्या.’
दिग्दर्शक मनोज सावंत आणि तुम्ही निर्माते सचिन बामगुडे या डिरेक्टर-प्रोड्युसरच्या जोडी मधील रंगलेली बाँडिंग कशी होती? असे विचारले असता त्यांनी सांगितले की,‘या इंडस्ट्रीमधील माझा हा पहिलाच अनुभव आहे. आम्ही लोन फिल्डचे आहोत. लोन देताना कशी सगळ्या गोष्टीची चौकशी मग व्हेरिफिकेशन होते आणि मग लोन दिले जाते. तसंच हे आहे. कारण आपण विशिष्ट दिलेली रक्कम समोरील व्यक्ती भरुन काढेल का याचा पण विचार केला जातो. मनोजजी जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आले तेव्हा ते दिग्दर्शक म्हणून चित्रपट व्यवस्थित करेल की नाही करेल, परफेक्ट बनवतील की नाही याच्यासाठी मी त्यांचा पूर्ण अनुभव तपासून पाहिला, ज्याला आपण ट्रॅक रेकॉर्ड म्हणतो. त्यांनी डिरेक्ट केलेली काम मी पाहिली, त्यांच्याशी बोललो त्यावरुन विश्वास बसला की, मी निर्मित करत असलेला चित्रपट मनोजजी नक्कीच चांगला बनवतील.’
आयुष्यावर प्रेम करायला लावणारा ‘लव्ह यु जिंदगी’ चित्रपट प्रेक्षकांना कोणती महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करुन देईल? असे विचारले असता त्यांनी सांगितले,‘प्रत्येक जण आपल्या आयुष्यावर प्रेम करतो. पण तुम्हाला मनापासून जे आवडेल ते करा. समाज काय बोलेल याचा विचार बाजूला ठेवून जे पॉझिटिव्ह असेल. तुम्हांला आवडत असेल ते करा. जीवनाचा आनंद घ्या कारण जीवन हे एकदाच मिळतं, त्यामुळे ज्या गोष्टीतून तुम्हांला आनंद मिळतो ते करा.’