'अप्सरा' फेम सोनाली कुलकर्णीच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 12:51 PM2022-08-08T12:51:26+5:302022-08-08T12:52:05+5:30
Sonalee Kulkarni And Kunal Benodekar: आता चाहत्यांना सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सनई चौघडे... फुलांच्या रंगीबेरंगी माळा... लग्नमंडप... जरतारीच्या पैठणीमध्ये, दागिन्यांमध्ये सजलेली नवरी, तर शेरवानीमध्ये राजबिंडा दिसणारा नवरा... पाहुण्यांची लगबग... जेवणात मराठमोळा बेत... हा भव्य, पारंपरिक लग्नसोहळा रंगला होता लंडनमध्ये आणि तोही आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीचा म्हणजेच सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि कुणाल बेनोडेकर(Kunal Benodekar)चा. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना या लग्न सोहळ्याला उपस्थित राहाण्याचे निमंत्रणही दिले होते. आता या लग्नसोहळ्याची झलकही चाहत्यांच्या भेटीला आली असून कधी हा सोहळा 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर पाहाता येईल, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.
खरंतर अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली-कुणालचा लग्न समारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनाली कुलकर्णीचे लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती आणि म्हणूनच चाहत्यांची ही इच्छा 'प्लॅनेट मराठी' ओटीटी पूर्ण करत आहे. त्यामुळे आता चाहत्यांना सोनाली आणि कुणालच्या आयुष्यातील या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे.
एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ११ ऑगस्ट रोजी झळकणारा हा लग्नसोहळा काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
सोनाली कुलकर्णी म्हणते, आपले लग्न धुमधडाक्यात व्हावे, हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. माझेही होते. परंतु जागतिक महामारीमुळे आम्ही रजिस्टर लग्न केले. त्यामुळे आमच्या लग्नात माझ्या माहेरच्या-सासरच्या कोणालाच सहभागी होता आले नाही. त्यामुळेच सर्व काही आलबेल झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच्या लोकांसोबत अगदी पारंपारिक पद्धतीने लग्न केले. त्यानंतर आधुनिक पद्धतीने रिसेप्शनही केले. खरंतर कलाकार हे नेहमीच आपल्या अनेक वैयक्तिक गोष्टी या खासगी ठेवतात, मात्र मला माझा आयुष्यतील आनंदाचा क्षण माझ्या चाहत्यांसोबत शेअर करायचा आहे, म्हणूनच मी या सोहळ्याचे प्रसारण करण्याचे ठरवले आणि यासाठी प्लॅनेट मराठीसारखे उत्तम ओटीटी मला मिळाले, ज्यामुळे माझा लग्नसोहळा जगभरातील मराठी प्रेक्षक पाहू शकतील.''