'नात्याची गोष्ट' नाटकाच्या टिमचे धाडस; नाट्य निर्मात्यांना हवे आहेत मोठे सेलिब्रिटी!
By संजय घावरे | Published: August 22, 2023 10:09 PM2023-08-22T22:09:59+5:302023-08-22T22:10:10+5:30
विभक्त झालेल्या दाम्पत्यांच्या रिलेशनशीपवर आजपर्यंत बरीच नाटके आली, पण डिव्होर्सनंतर त्यांच्या मुलांचे काय होते हे दाखवणारे नाटक आलेले नाही.
मुंबई - यंदा महाराष्ट्र राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या 'नात्याची गोष्ट' या नाटकाला रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवाव्या लागत आहेत. नाटकांचे माहेरघर असणाऱ्या महाराष्ट्रात हे नाटक जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केवळ एक रूपयात दाखवले जात आहे.
विभक्त झालेल्या दाम्पत्यांच्या रिलेशनशीपवर आजपर्यंत बरीच नाटके आली, पण डिव्होर्सनंतर त्यांच्या मुलांचे काय होते हे दाखवणारे नाटक आलेले नाही. 'नात्याची गोष्ट' हे नाटक याच विषयावर भाष्य करते. या अनोख्या वनलाईनसह विविध वैशिष्ट्यांच्या बळावर या नाटकाने यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. त्यानंतर 'नात्याची गोष्ट' केवळ स्पर्धेपुरते न राहता जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचावे या हेतूने नाटकाच्या टिमने बऱ्याच नाट्यनिर्मात्यांना नाटक दाखवले. सर्वांनीच नाटकाचे तोंडभरून कौतुक केले, पण नाटकाची निर्मिती करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे 'नात्याची गोष्ट'च्या संपूर्ण टिमनेच हे नाटक रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे शिवधनुष्य उचलत केवळ एक रुपयात नाटक दाखवण्याचा निर्णय घेतला. आजवर या नाटकाचे ३६ प्रयोग झाले असून, २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता प्रभादेवीतील रविंद्र नाट्य मंदिरमध्ये रसिकांना एक रुपयात ३७वा प्रयोग पाहायला मिळणार आहे. मागील काही वर्षांपासून मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या 'अलबत्या गलबत्या' या नाटकात सध्या चिंची चेटकीणीची भूमिका वठवणाऱ्या निलेश गोपनारायणने या नाटकाचे दिग्दर्शन केले असून, मुख्य भूमिकाही साकारली आहे.
तुम्हाला बघायला कोण येणार?
या नाटकात मनोहर (अण्णा) ही व्यक्तिरेखा साकारणारा अद्वैत चव्हाण 'लोकमत'शी बोलताना म्हणाला की, राज्यनाट्य स्पर्धेत बाजी मारल्यानंतर बऱ्याच निर्मात्यांनी नाटक पाहून शाबासकी दिली, पण त्यांना नाटकात सेलिब्रिटी हवे आहेत. तुम्हाला बघण्यासाठी तिकिट खिडकीवर कोण येणार? असा त्यांचा प्रश्न होता. यामुळे खचून न जाता आम्ही नाटक सुरूच ठेवले आहे. एक रुपयात रसिकांना नाटकासाठी आमंत्रित करत आहोत. नाटक आवडले तर त्यांनी स्वेच्छा मूल्य द्यावे ही संकल्पना आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत विषय पोहोचवण्यासाठी हि धडपड आहे.
स्वेच्छा मूल्यातून पुढचा खेळ...
'नात्याची गोष्ट' पाहण्यासाठी लोक येतात, त्यांना नाटक आवडते आणि स्वेच्छा मूल्याच्या बॉक्समध्ये पैसे टाकतात. त्यातून पुढील प्रयोग केला जातो. या बॉक्समध्ये आजवर कमीत कमी २० हजार रुपयांपासून जास्तीत जास्त ४० हजार रुपयांपर्यंत जमा झाले आहेत. कोणीही मानधन घेत नाही. स्वेच्छा मूल्यातून जमा झालेल्या रकमेतून पुढील प्रयोग सादर होतो - निलेश गोपनारायण (दिग्दर्शक-अभिनेता)
एका वेगळ्या विषयावर आधारलेले 'नात्याची गोष्ट' हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मात्यांनी पुढाकार घ्यायला हवा. व्यक्तिरेखांपेक्षा नाटकाचा विषयच खूप मोठा सेलिब्रिटी आहे. चांगला विषय समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मात्यांनी धाडस दाखवावे. चांगल्या विषयाला फेस व्हॅल्यूची गरज नसते असे मला वाटते.