पायाला जखम झालेली असतानाही अजय पूरकर यांनी केलं शूटिंग, दिग्दर्शक म्हणाले, "सेटवर रक्ताच्या थारोळ्या..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 01:43 PM2023-08-08T13:43:50+5:302023-08-08T13:45:21+5:30
अॅक्शन सीन शूट करताना अजय पूरकर यांच्या पायाला झालेली जखम, दिग्दर्शकांनी सांगितला प्रसंग, म्हणाले, "सेटवर रक्ताच्या थारोळ्या..."
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत 'सुभेदार' या ऐतिहासिक मराठी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. सुभेदार तानाजी मालुसरेंची शोर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड',' शेर शिवराज' या चित्रपटाच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर श्री शिवराज अष्टाकातील हा पाचवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात अभिनेता अजय पुरकर तानाजी मालुसरेंची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सध्या सुभेदारची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
'सुभेदार' चित्रपटाच्या टीमने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा प्रसंग सांगितला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अजय पूरकर यांच्या पायाला जखम झाली होती. जखमी असतानाही अजय पूरकर यांनी चित्रपटातील अँक्शन सीन शूट केले होते. याबाबत दिग्पाल लांजेकरांनी मुलाखतीत भाष्य केलं. ते म्हणाले, "तान्हाजी मालुसरे 'आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' अशी शपथ घेतात, तो सीन आम्ही शूट करत होतो. नाटकाची तालीम करतात, तशी तालीम करुन आम्ही सीन शूट करतो. कधी कधी मी कट म्हणायचो विसरुन जायचो...सगळेच कलाकार इतकं चांगलं काम करतात की ते बघताना मी पण भारावून जायचो."
"अजय दादांनी तो सीन एकदम उत्कृष्टरित्या केला. तेव्हा त्यांच्या पायाला दोन इंचाची जखम झाली होती. अॅक्शन सीन करताना अंगठा आणि बोटाच्या मध्ये त्याचा पाय फाटला होता. त्याला बसता उठताही येत नव्हतं. एका अॅक्शन सीनने सेटवर रक्ताच्या थारोळ्या व्हायच्या. पण अशा परिस्थितीतही त्याने सीन शूट केला. तो सीनही खूप जबरदस्त झाला. सगळेच भारवून गेले होते," असं त्यांनी सांगितलं.
"माझी लाडकी प्राजक्ता...", 'राणी' म्हणत अमृता खानविलकरने प्राजक्ता माळीला दिल्या हटके शुभेच्छा
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' हा चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अजय पूरकर, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.