Exclusive: "शाळेतला इतिहास फक्त मार्कांपुरता", चिन्मय मांडलेकरचं वक्तव्य, म्हणाला, "अनेक शिवकालीन गोष्टी......"
By कोमल खांबे | Published: August 25, 2023 02:33 PM2023-08-25T14:33:57+5:302023-08-25T14:36:38+5:30
शिवरायांची भूमिका साकारलेल्या चिन्मय मांडलेकरचं वक्तव्य, म्हणाला, "अनेक शिवकालीन गोष्टी..."
गेल्या काही दिवसांपासून ‘सुभेदार’ या ऐतिहासिक मराठी सिनेमाची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते तो सुभेदार चित्रपट अखेर आज(२४ ऑगस्ट) सर्वत्र प्रदर्शित झाला. दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकमधील हा पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकरने ‘लोकमत’शी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक किस्से त्यांनी सांगितले.
शिवराज अष्टकातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चारही चित्रपटांमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकरनेछत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आता सुभेदारमध्येही चिन्मय शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. या मुलाखतीत त्याने महाराजांची भूमिका आणि इतिहासाबद्दलही भाष्य केलं. चिन्मय म्हणाला, “हे चित्रपट करायला लागल्यानंतर मला अनेक शिवकालीन गोष्टी समजल्या. आपण शाळेत तो इतिहास शिकतो तो केवळ मार्कांपुरता असतो. ती फक्त इतिहासाची तोंडओळख आहे. त्यात सविस्तर वर्णन केलेलं नसतं. या चित्रपटाच्या निमित्ताने मी खूप वाचन केलं. त्यामुळे अनेक गोष्टी मला समजल्या.”
चिन्मयने या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना काय भावना असतात, हेदेखील मुलाखतीत सांगितलं. “महाराजांची भूमिका साकारताना दडपणापेक्षाही जबाबदारीची जाणीव असते. लोकांच्या मनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, ही प्राथमिक जबाबदारी असते. त्यामुळे अभिनय करताना त्याचं भान नेहमी ठेवावं लागतं. नाहीतर मग लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं,” असं चिन्मयने सांगितलं.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित सुभेदार चित्रपटातून ‘सुभेदार’ तान्हाजी मालुसरेंच्या असीम शौर्याची गाथा पडद्यावर दाखविण्यात येणर आहे. सिंहगडाच्या लढाईचा थरार या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. अजय पूरकर या चित्रपटात तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत आहे. विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.