Subodh Bhave Birthday Special : सुबोध भावे बारावीत झाला होता नापास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 05:23 PM2018-11-09T17:23:42+5:302018-11-09T17:30:13+5:30
सुबोध आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता असला तरी त्याच्यासाठी हे यश मिळवणे सोपे नव्हते. त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे.
सुबोधचा आज म्हणजेच ९ नोव्हेंबरला वाढदिवस असून १९७५ ला पुण्यात त्याचा जन्म झाला. त्याने त्याचे शिक्षण पुण्यातील सिम्बोसिस कॉलेजमधून पूर्ण केले आहे. त्याने अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी एका आयटी कंपनीत सेल्समनचे काम देखील केले होते.
सुबोध भावेने चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये काम केले आहे. सुबोधने कॉलेज जीवनापासूनच एकांकिकामध्ये काम करायला सुरुवात केली. त्याला त्यावेळी अनेक पारितोषिकं मिळाली होती. त्याने अभिनय करण्यासोबतच दिग्दर्शन देखील केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेला कट्यार काळजात घुसली हा चित्रपट चांगलाच गाजला होता. सध्या त्याची तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. त्याचसोबत त्याचा आणि काशिनाथ घाणेकर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील सुबोधची भूमिका तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहे. सुबोधने आज मराठी चित्रपटसृष्टीत त्याची एक खास जागा निर्माण केली आहे. तो एक खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक देखील आहे. त्याने मराठीसोबत हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
सुबोध आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता असला तरी त्याच्यासाठी हे यश मिळवणे सोपे नव्हते. त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. तुम्हाला माहीत आहे का, सुबोधला हे यश मिळण्याआधी अनेक अपयशं पचवलेली आहेत. प्रेक्षकांचा लाडका सुबोध बारावीच्या परीक्षेत नापास झाला होता. त्याने नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. त्याने सांगितले आहे की, मी बारावीत नापास झालो नसतो तर बहुधा आज मिळालेले यश मला मिळालेच नसते. मी बारावीत पास झालो असतो तर इतरांप्रमाणे मी देखील बीएस्सी अथवा बीई केले असते आणि कुठेतरी नोकरी करत असतो. पण माझ्या नापास होण्यानेच माझे आयुष्य संपूर्णपणे बदलले. मला मिळालेल्या या अपयशामुळे आता मला नापास होण्याची भीती राहिलेली नाही. तसेच त्याचमुळे आता मी प्रयोग करायला देखील घाबरत नाही. एखादा प्रयोग चुकला तर मी नापास होईल याची मला भीती नसते. कारण मी आयुष्यात एकदा नापास झालेलो आहे. मी नापास झालो म्हणूनच मला काठावर पास करणारी मंडळी माझ्या आयुष्यात आली असे मला नेहमीच वाटते.