सुबोध भावे म्हणतोय, आजच्याच दिवशी तिने मला हो म्हटलं... वाचा सुबोध आणि मंजिरीची लव्हस्टोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 05:19 PM2021-05-06T17:19:49+5:302021-05-06T17:20:30+5:30
सुबोधने त्याच्या पत्नीसोबत फोटो पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, आजच्या दिवशी तिने मला 'हो" म्हटलं...
सुबोध भावे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याच्या चित्रपटांविषयीचे, खाजगी आयुष्याविषयीचे अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
सुबोधने त्याच्या पत्नीसोबत फोटो पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, आजच्या दिवशी तिने मला 'हो" म्हटलं... सुबोध आणि मंजिरी यांची आज लव्ह एनिव्हर्सरी असून त्यांचे चाहते तसेच सेलिब्रेटी त्यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहेत.
सुबोध आणि मंजिरी यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. सुबोध नाट्यसंस्कार कला अकादमी मध्ये असताना त्याची आणि मंजिरीची ओळख झाली होती. त्यावेळी मंजिरी आठवीत तर सुबोध दहावीत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सुबोधला अभिनय येत नसल्याने त्याला नाटकातून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे तो बॅकस्टेजचे काम करत होता तर मंजिरी नाटकात काम करत होती. तिला पाहाताच क्षणी सुबोध तिच्या प्रेमात पडला होता आणि शाळेत असतानाच त्याने मंजिरीला प्रपोज केले होते.
त्या दोघांची शाळा वेगळी होती. त्यामुळे सुबोध मंजिरीला पाहण्यासाठी नाक्यावर उभा राहायचा. त्यावेळी त्यांच्यात केवळ नजरानजर व्हायची. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर त्याने शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यू, व्हॉट इज माय फॉल्ट असे लिहित मंजिरीला प्रपोज केले होते. त्यावर मंजिरीने मी बालगंधर्वच्या पुलावर आले तर माझा होकार असेल असे सुबोधला सांगितले होते आणि ती खरंच त्या पुलावर आली आणि सुबोधला उत्तर मिळाले.
सुबोध आणि मंजिरी यांनी त्यांच्या प्रेमाची कल्पना कुटुंबियांना देखील दिली. पण तुम्ही शिक्षण पूर्ण करा असा सल्ला त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना दिला. त्या दोघांचे शिक्षण सुरू होते. त्याच दरम्यान मंजिरी बारावीत असताना कॅनडाला शिफ्ट झाली. त्यावेळी केवळ पत्रांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क असायचा. कॅनडातून परतल्यावर त्या दोघांनी पुण्यात एकाच ठिकाणी नोकरी केली आणि त्यानंतर साखरपुडा केला. लग्न झाले त्यावेळी सुबोध नोकरी करत होता. पण कामात मन रमत नसल्याने त्याने नोकरी सोडून पूर्ण वेळ अभिनयाला दिला.