कोपऱ्यातील कलाकार आज आहे मराठीतील सुपरस्टार, पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते केवळ १०० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 05:59 PM2020-05-12T17:59:02+5:302020-05-12T18:00:19+5:30
कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या या कलााकाराचा हा पहिलाच चित्रपट असून आज हा कलाकार मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. सगळेच लोक आपआपल्या घरात कैद आहेत. केवळ सर्वसामान्यच नाहीत तर सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीतील आणि टीव्हीचे स्टार्स वेगवेगळ्या पद्धतीने घरात वेळ घालवत आहेत. अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून ते सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत.
अभिनेता सुबोध भावेने त्याचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोतील सुबोधला ओळखणे देखील कठीण जात आहे. हा सुबोधच्या पहिल्या चित्रपटाचा फोटो असून त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये तसे नमूद देखील केले आहे. सुबोधने शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला काळ्या रंगाच्या कपड्यात एक मुलगा कोपऱ्यात उभा असलेला दिसत आहे. तो मुलगा दुसरा कोणीही नसून प्रेक्षकांचा लाडका सुबोध भावे आहे. सुबोधने फोटोसोबत लिहिले आहे की, माझा पहिला चित्रपट...
सुधीर फडके यांची निर्मिती असलेला "वीर सावरकर"
मदनलाल धिंग्रा लॉर्ड कर्झनची हत्या करतो तो सीन.
मदनलाल धिंग्रा दारातून आतमध्ये प्रवेश करताना ,दाराजवळ जो ब्रिटिश सैनिक थांबलाय तो मी.
पाहिलं मानधन १०० रुपये
कामाचे दिवस --- फक्त एक
सुबोधची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल आहे. केवळ दोन तासांत या पोस्टला दोन हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून ३२ जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे तर १७७ लोकांनी या पोस्टवर कमेंट केली आहे.
सुबोध भावेने आज मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. मराठीतील सुपरस्टार अभिनेत्यांमध्ये आज त्याची गणना केली जाते. त्यांच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले आहे.