वेगळ्या विषयावरचा ‘एक निर्णय’ रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 03:49 PM2019-01-19T15:49:48+5:302019-01-19T15:51:12+5:30
स्वतःसाठी केली जाणारी प्रत्येक गोष्ट ही केवळ स्वार्थापोटी नसून ती त्या व्यक्तीची गरजही असू शकते असा सकारात्मक दृष्टीकोन एक निर्णय हा चित्रपट प्रेक्षकांना देत आहे.
कोणत्याही व्यक्तीची निर्णयक्षमता त्याच्या भविष्याची दिशा निश्चित करत असते. रोजच्या आयुष्यात आपण असंख्य निर्णय घेत असतो. ते सगळेच निर्णय बहुतांश वेळा आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी किंवा त्यांच्या मतांनुसार घेतले जातात. पण जेव्हा स्वतःसाठी एखादा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा मात्र ‘लोकं काय म्हणतील?’ या प्रश्नात आपण अडकून पडतो. त्या विशिष्ट क्षणी केवळ स्वतःची गरज म्हणून स्वतःसाठी घेतलेला ‘एक निर्णय’ आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो, आपल्या इच्छित ध्येयापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर आधारित स्वरंग प्रोडक्शन्स प्रस्तुत आणि अभिनेते श्रीरंग देशमुख लिखित, निर्मित, दिग्दर्शित ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी निगडीत असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर हा चित्रपट भाष्य करतो. सध्याच्या पिढीला केवळ विचारप्रवृत्त नाही तर निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणारा हा चित्रपट आहे. कोणताही निर्णय कोणीही केवळ स्वतःसाठी घेतलेला असला तरी कुटुंब आणि समाजावर त्याचे काय परिणाम होतात? हे दाखवत, निर्णय घेताना सारासार विचार करायला हवा हा संदेश ही चित्रपट देतो. स्वतःसाठी केली जाणारी प्रत्येक गोष्ट ही केवळ स्वार्थापोटी नसून ती त्या व्यक्तीची गरजही असू शकते असा सकारात्मक दृष्टीकोन हा चित्रपट प्रेक्षकांना देत आहे.
स्वरंग प्रोडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, स्वप्नाली पाटील यासारख्या नावाजलेल्या कलाकारांच्या भूमिका आहेत. सोबत कुंजिका काळविंट हा नवा चेहरा या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे.
जयंतीलाल जैन, संतोष परांजपे, दिनेश ओस्वाल, किशोर जैन, संगीता पाटील, सुलभा देशमुख हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटातली गीतं वैभव जोशी यांनी लिहिली असून, कमलेश भडकमकर यांनी ती स्वरात बांधली आहेत. रोहन श्रीरंग देशमुख याने सुद्धा चित्रपटातील एक गाणं संगीतबद्ध केले आहे. छायांकन अर्चना बोऱ्हाडें यांचे असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी एकनाथ कदम यांनी सांभाळली आहे. संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक यांचे असून ध्वनी आरेखन विजय भोपे यांनी केले आहे. वेशभूषा गीता गोडबोले तर रंगभूषा महेश बराटे यांनी केली आहे. निहिरा जोशी देशपांडे, ऋषिकेश कामेरकर, जयदीप वैद्य, श्रुती आठवले, अंजली मराठे यांनी यातील गाणी गायली आहेत.