"अक्षय कुमारच्या भावाची भूमिका साकारण्यात मला इंटरेस्ट नाही", बॉलिवूडमध्ये काम करण्यावरुन सुबोध भावे स्पष्टच बोलला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 02:28 PM2023-12-02T14:28:18+5:302023-12-02T14:28:36+5:30
मराठीबरोबरच सुबोधने काही हिंदी सिनेमांतही काम केलं आहे. पण, बॉलिवूडमध्ये सुबोध फारसा रमला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यावर स्पष्ट मत मांडलं आहे.
सुबोध भावे हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांतही त्याने विविधांगी भूमिका साकारत त्याच्या अभिनयाची छाप पाडली. गेली कित्येक वर्ष दमदार भूमिका साकारून तो प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहे. मराठीबरोबरच त्याने काही हिंदी सिनेमांतही काम केलं आहे. पण, बॉलिवूडमध्ये सुबोध फारसा रमला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यावर स्पष्ट मत मांडलं आहे.
कमालीचा अभिनय आणि उत्कृष्ट भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सुबोधने नुकतीच 'इसापनीती' या युट्यूब चॅनेलच्या 'छापा काटा' शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत बॉलिवूडमध्ये काम करण्यावरुन सुबोधने त्याचं मत मांडलं. "कुठलीच गोष्ट मी ठरवून करत नाही. ज्या गोष्टी मनाला भिडल्या, आवडल्या आणि मनापासून कराव्याशा वाटल्या त्या मी करतो. त्यांच्यावर राग आहे म्हणून मी हिंदीत काम करत नाही, असं नाही. मला अभिनेता म्हणून काम मिळालं पाहिजे. हिंदी भाषा आहे, म्हणून मला काम करायचं नाही. तिथे जाऊन अक्षय कुमारच्या भावाची भूमिका साकारण्यात मला शून्य इंटरेस्ट आहे. माझ्या अभिनयाचा मान ठेवून मला काम मिळालं तर करेन. जसं की ताजमध्ये मी बिरबलाची भूमिका केली. सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओमध्ये उत्तम भूमिका माझ्या वाट्याला आली. मी आणखी एक हिंदी सिनेमा करतोय. त्यातही चांगली भूमिका साकारतोय. अशी भूमिका मिळाल्या तर मी करेन. फक्त हिंदी आहे म्हणून मी काम करणार नाही," असं सुबोध भावे म्हणाला.
"मी मराठीत फार उत्तम भूमिका करतोय. स्वत:ला पाहिजे त्याप्रकारे मराठीत मला भूमिका शोधता येत आहेत. स्वत:ला घडवता येत आहे. उगाचच हिंदी आहे, भलीमोठी नावं आहेत...म्हणून कोणाच्या तरी मित्राचा किंवा भावाचा...असे रोल हिंदी भाषा आहे म्हणून करण्यात इंटरेस्ट नाही. त्यांना करायचे असतील तर त्यांनी मराठीत येऊन करावेत. मी तिथे जाऊन करणार नाही," असंही सुबोधने स्पष्टपणे सांगितलं.
सुबोध भावेने अनेक बायोपिकमध्ये काम केलं आहे. 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', 'लोकमान्य एक युगपुरुष' या चित्रपटांतील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या हिंदी सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.