लॉस एंजलिस येथे होणार 'या' मराठी चित्रपटाचे शूटिंग, या कलाकारांच्या असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 08:00 AM2019-02-22T08:00:00+5:302019-02-22T08:00:00+5:30

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणार आहे. या निमित्ताने एक मानाचा तुरा मराठी चित्रपटांच्या शिरपेचात रोवला जाणार आहे.

Sukh mhanje nakki kay aste First Marathi Movie Shooting In Los Angeles | लॉस एंजलिस येथे होणार 'या' मराठी चित्रपटाचे शूटिंग, या कलाकारांच्या असणार भूमिका

लॉस एंजलिस येथे होणार 'या' मराठी चित्रपटाचे शूटिंग, या कलाकारांच्या असणार भूमिका

googlenewsNext

आशयघनता आणि व्यावसायिक गणितं याची उत्तम सांगड घालीत यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचा आलेख चढता आणि गौरवशाली राहिला आहे. सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी नव्या फळीचे निर्माते दिग्दर्शक घेताना दिसताहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्या देखील मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी उत्साही आहेत.

 

मराठी चित्रपटांचा आशय-विषय, तांत्रिक कौशल्य आणि निर्मीतीमूल्य पाहून मराठी चित्रपटनिर्मितीसाठी अनेकजण स्वारस्य दाखवत असतानाच घडणारी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ‘साईबाबा स्टुडिओज’ आणि ‘समृद्धी सिनेवर्ल्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणार आहे. या निमित्ताने एक मानाचा तुरा मराठी चित्रपटांच्या शिरपेचात रोवला जाणार आहे.

 

टेलीव्हिजन विश्वात अनेक दर्जेदार कलात्मक कार्यक्रम देणारी ‘साईबाबा स्टुडिओज’ ही निर्मितीसंस्था या निमित्ताने मराठीत पहिले पाऊल टाकणार आहे. तसेच ‘मला आई व्हायचंय’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि हिंदीतला ‘हेमलकसा’ असे संवेदनशील विषय रुपेरी पडद्यावर आणणाऱ्या गुणी दिग्दर्शिका समृद्धी पोरे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या तीन चित्रपटाच्या यशानंतर काहीतरी नवीन करण्याचा समृद्धी यांचा मानस होता. तसेच हिंदीत एकाहून एक सरस कार्यक्रमांची निर्मिती केल्यानंतर मराठीत आपलं वेगळपण दाखवून देण्यासाठी ‘साईबाबा स्टुडिओज’चे शिवकुमार उत्सुक होते. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रपटाच्या निमित्ताने वेगळी वाट चोखाळत प्रेक्षकांना नवं काहीतरी देण्याच्या उद्देशाने हे दोघेजण एकत्र आले आहेत.

 

मराठी हॉलीवूड चित्रपटाबद्दल बोलताना ‘साईबाबा स्टुडिओज’ कंपनीचे शिवकुमार सांगतात की, एक चांगली निर्मीतीसंस्था या नात्याने प्रेक्षकांना आम्ही काय देत आहोत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी माझ्या मनात आदर असून या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीसाठी आपलंही योगदान देता येत असल्याचं समाधान ते व्यक्त करतात. चाकोरीबाहेर जाऊन प्रेक्षकांना काहीतरी हटके देण्यातला आनंद दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी व्यक्त केला.

‘साईबाबा स्टुडिओज’ निर्मिती संस्थेची कामगिरी व समृद्धी पोरे यांच्या दिग्दर्शकीय कौशल्यातून एक सकस कलाकृती लवकरच मराठी प्रेक्षकांना पहायला मिळेल हे नक्की. या चित्रपटाच्या विषयाची तसेच गुलदस्त्यात असणाऱ्या कलाकारांची नावे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Sukh mhanje nakki kay aste First Marathi Movie Shooting In Los Angeles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.