सुलभा देशपांडे यांची बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 09:54 IST2025-03-07T09:54:20+5:302025-03-07T09:54:58+5:30
Prema Sakhardande Death: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे वयाच्या ९४व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गुरूवारी (ता. ६ मार्च) रात्री १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

सुलभा देशपांडे यांची बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचं निधन
Prema Sakhardande Death: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे (Prema Sakhardande) यांचे वयाच्या ९४व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. गुरूवारी (ता. ६ मार्च) रात्री १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी नाटक, चित्रपट, मालिका आणि जाहिरातीमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
प्रेमा साखरदांडे या ध्वनीमुद्रक वसंतराव कामेरकर यांच्या कन्या होत्या, बालपणापासूनच त्या कलेशी जोडल्या गेल्या होत्या. त्यांच्या बहिणी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे यांनीदेखील अभिनय क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या घरात कलेचे वातावरण असल्यामुळे दिग्गज लोकांचे येणेजाणे असायचे.
प्रेमा साखरदांडे यांनी मुंबईतील शारदा सदन शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्ती घेतली होती. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शालेय रंगभूमी हे पुस्तक लिहिले. बालनाटकात त्यांचे योगदान होते. सुलभा देशपांडे यांच्या आविष्कार आणि चंद्रशालेच्या संस्थापणात त्यांचाही मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांनी स्पेशल २६, द इम्पॉसिबल मर्डर, सावित्री बानो, आजी तेंडुलकर, मनन, माझे मन तुझे झाले, बेट, फुल ३ धमाल या सिनेमात काम केले होते. त्यांनी प्रपंच मालिकेत काम केले होते. वृद्धापकाळात त्या अभिनय क्षेत्रापासून दुरावल्या होत्या.