सुलोचना दीदींना लेकीने कधीही म्हटलं नाही आई; 'हे' होतं त्यामागचं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 01:53 PM2023-06-12T13:53:48+5:302023-06-12T13:55:26+5:30
Sulochana didi: रुपेरी पडद्यावर प्रेमळ आई म्हणून प्रचलित असलेल्या सुलोचना दीदींना खऱ्या आयुष्यात एकच लेक होती. मात्र, या लेकीने कधीही त्यांना आई या नावाने हाक मारली नाही.
मराठीसह हिंदी कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री म्हणजे सुलोचना दीदी (Sulochana) अर्थात सुलोचना लाटकर. वयाच्या ९४ व्या वर्षी सुलोचना दीदींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली असून आजही त्यांच्याविषयी अनेक गोष्टी, किस्से नेटकऱ्यांमध्ये रंगतात. रुपेरी पडद्यावर प्रेमळ आई म्हणून प्रचलित असलेल्या सुलोचना दीदींना खऱ्या आयुष्यात एकच लेक होती. मात्र, या लेकीने कधीही त्यांना आई या नावाने हाक मारली नाही. या मागचं कारण अलिकडेच समोर आलं आहे.
सुलोचना दीदी यांना एकुलती एक लेक असून तिचं नाव कांचन असं आहे. कांचन यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासोबत लग्न केलं. कांचन या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. मराठी कलाविश्वात आजही त्यांचा दबदबा पाहायला मिळतो. कांचन यांनी सुलोचना दीदींना कधीही आई म्हणून हाक मारली नाही. त्याऐवजी त्या एका वेगळ्याच नावाने त्यांना बोलवायच्या.
सुलोचना दीदी यांनी आबासाहेब चव्हाण यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि त्या संसारात रमल्या. परंतु, संसारासोबत त्यांनी करिअरची गाडीही तितकीच नेटाने सांभाळली. लग्नानंतरही त्यांचा फिल्मी प्रवास सुरु होता. त्यामुळे बऱ्याचदा त्यांनी सिनेमाच्या शुटींगनिमित्त बाहेरगावी जावं लागायचंय परिणामी, त्या त्यांच्या लेकीला कांचन हिला त्यांच्या भावाकडे सोडायच्या. सुलोचना दीदी यांच्या भावाची मुलं त्यांना आत्या म्हणायचे. त्यामुळेच लहानपणापासून भावंडांसोबत मोठी झालेली कांचन भावांचं अनुकरण करु लागली. तीदेखील त्यांच्यासोबत सुलोचना दीदींना आई न म्हणता आत्याच म्हणून लागली. त्यामुळे आजपर्यंत कांचन यांनी कधीही सुलोचना दीदींना आई म्हटलं नाही.