डोक्यावर पदर आणि मनात आदर! सूरज चव्हाणच्या बहिणींची कृतज्ञता, भर कार्यक्रमात रितेश देशमुख-केदार शिंदेंच्या पडल्या पाया
By कोमल खांबे | Updated: April 12, 2025 10:43 IST2025-04-12T10:43:12+5:302025-04-12T10:43:34+5:30
गावाकडचे संस्कार! सूरज चव्हाणच्या बहिणींनी जिंकली मनं, 'त्या' कृतीचं होतंय कौतुक

डोक्यावर पदर आणि मनात आदर! सूरज चव्हाणच्या बहिणींची कृतज्ञता, भर कार्यक्रमात रितेश देशमुख-केदार शिंदेंच्या पडल्या पाया
सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. केदार शिंदेंचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर रितेश देशमुखच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलर लॉन्च सोहळ्यातील काही व्हिडिओ समोर आले आहे. 'झापुक झुपूक' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला सूरज चव्हाणच्या बहिणींनीही हजेरी लावली होती. या सोहळ्यात सूरजच्या बहिणींच्या कृतज्ञतेच्या भावनेने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली.
'झापुक झुपूक' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला सूरजच्या बहिणींचा साधेपणा दिसून आला. साड्या नेसून आणि डोक्यावर पदर घेऊन त्याच्या बहिणी या सोहळ्याला उपस्थित होत्या. झापुक झुपूक किंगच्या बहिणींच्या गावाकडच्या संस्कारांनी उपस्थितांची मनंही जिंकून घेतली. सूरजच्या बहिणींनी स्टेजवर जाताच रितेश देशमुख आणि केदार शिंदे यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेत त्यांच्याप्रती असलेला आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' सिनेमा येत्या २५ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असून जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. जिओ स्टुडिओ आणि केदार शिंदे प्रोडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे.