आश्चर्य वाटेल! प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेता घेतोय ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 08:37 PM2020-09-02T20:37:50+5:302020-09-02T20:39:00+5:30
CoronaVirus Thane: कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे.
ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय म्हटले की, अनेक जण नाक मुरडत असतात. मात्र, कोरोनाच्या महामारीत याच रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून यामध्ये गोरगरीब रुग्णांसह मराठी अभिनेत्याचा देखील समावेश आहे. ऐकून आश्चर्याचा धक्का बसला ना? हो, हे खरेय. हा मराठी अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिजीत केळकर आहे.
कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. अभिनेता सुबोध भावे आणि त्याच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर आता अभिनेता अभिजीत केळकर यालादेखील कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भातील माहिती अभिजीत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली. तसेच अभिजित केळकर हे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
केळकर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून केवळ त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केळकर यांना इतर रुग्णांमध्ये न ठेवता, त्यांना प्रिफॅब्रिकेटेड पोर्टेबल कंटेनरमध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णच नाही तर, सिने अभिनेते देखील उपचारार्थ दाखल होण्यासाठी जिल्हा रुग्णालयाला पसंती देत असल्याने आता सामान्य नागरिकांचाही दृष्टीकोण बदलण्याची शक्यता आहे.
या संदर्भात जिल्हा रुग्णालय प्रशासनास विचारले असता, रुग्णालय प्रशासनाने देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून अभिजित केळकर यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.