मराठी नाट्य कलाकार संघाच्या अध्यक्षपदी सुशांत शेलार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 07:44 PM2022-09-13T19:44:41+5:302022-09-13T19:45:58+5:30
Sushant Shelar: मराठी नाट्य कलाकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सुशांत शेलार यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मराठी नाट्य कलाकार संघाच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलार (Sushant Shelar) यांची निवड करण्यात आली आहे. मराठी नाट्य कलाकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सुशांत शेलार यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निर्माता संघ, रंगमंच कामगार संघ आणि मराठी नाट्य कलाकार संघ अशा तीन घटक संस्था आहेत. त्यापैकी मराठी नाट्य कलाकार संघाची सर्वसाधारण सभा आज १३ सप्टेंबर २०२२ रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरमध्ये पार पडली. यामध्ये सर्वानुमते सुशांत शेलार यांची संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघाच्या सर्वसाधारण सभेत माजी अध्यक्ष प्रदीप कबरे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुशांत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मागील दहा वर्षांपासून अध्यपदाची धुरा सांभाळल्यानंतर नवीन पिढीला संधी देण्याच्या उद्देशाने कबरे यांनी सुशांत यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचवले. त्यांच्या नावाला उपाध्यक्ष शरद पोंक्षे यांनी अनुमोदन दिले.
अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर 'लोकमत'शी बोलताना आपल्या भावना व्यक्त करताना सुशांत म्हणाले की, खूप मोठी जबाबदारी खांद्यावर आली आहे. शासन दरबारी असलेल्या विविध योजनांचा लाभ मराठी कलाकार संघाला मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. कलाकारांच्या अडचणी समजून घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचवून लवकरात लवकर सोडवण्याचे काम करणार आहे. संघाचा फंड वाढवण्यासाठी पुढाकार घेऊन त्याचा ज्येष्ठ कलाकारांना फायदा मिळवून देण्याचा मानस आहे. ही एकट्याची जबाबदारी नसून सर्व कलाकारांचे पाठबळ मिळणे गरजेचे असल्याचेही सुशांत म्हणाले.