सुयश टिळकचे बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, दिसणार हटक्या भूमिकेत
By तेजल गावडे | Updated: September 28, 2020 13:06 IST2020-09-28T13:05:20+5:302020-09-28T13:06:06+5:30
आता सुयश टिळक बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

सुयश टिळकचे बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण, दिसणार हटक्या भूमिकेत
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळकने का रे दुरावा मालिकेतील जयच्या भूमिकेतून घराघरात पोहचला. आतापर्यंत मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने सुयशने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आता सुयश टिळक बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो खाली पीली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतो आहे. या चित्रपटात तो वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.
'खाली-पीली' या सिनेमामध्ये सुयश निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मंग्या नामक गुंडाची भूमिका साकारणार आहे तर अनन्या पांडे आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुयशने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सुयशने इंस्टाग्रामवर खाली पीली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर केले आणि लिहिले की, खाली पीली लवकरच रिलीज होणार आहे आणि यात माझी छोटीशी भूमिका आहे. आता सर्वांचेे आभार मानण्याची आणि कौतूक करण्याची वेळ आली आहे. दिग्दर्शक मकबूल खान यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये काम करायला मजा आली. मंग्याच्या पात्रासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे आभारी आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचा प्रवास खूपच इंटरेस्टिंग होता. त्यासाठी कितीही आभार मानले तरी कमी आहे. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. आदिल सर तुम्ही जादूगार आहात. प्रत्येक फ्रेम कॅमेऱ्यात अप्रतिमरित्या कैद केली आणि सातत्याने पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे.
इतकेच नाही तर जयदीप पहलावत, झाकीर हुस्सैन, ईशान खट्टर व अनन्या पांडेसोबत आलेल्या कामाचा अनुभवही शेअर केला. या पोस्टच्या माध्यमातून सुयशने सर्वांचे आभार मानले. तसेच या चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकतेने वाट पाहतो आहे.
या व्यतिरिक्त सुयशने आणखीन एक इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ईशान व सुयश फायटिंग करताना दिसत आहेत. सुयशचे चाहते त्याचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
सुयशची नवीन मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'शुभमंगल ऑनलाइन' या मालिकेतून सुयश आणि सायली संजीव ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.