स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली माडेचे नवीन गाणं ‘माझ्या रानफुला’लवकरच रसिकांच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 06:40 PM2019-02-21T18:40:32+5:302019-02-21T18:41:37+5:30
ऑनलाईन मिस्टेक ह्या चित्रपटात गणेश यादव, रोहन पेडणेकर, प्रल्हाद चव्हाण, विशाल पाटील, आदिती कांबळे, साया काशिद, अस्मिता खटखटे प्रमुख भूमिकेत आहेत.
‘ऑनलाईन मिस्टेक’ हा मराठी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. आस्क मोशन फिल्म्स प्रस्तुत ह्या चित्रपटाचे निर्माते अरुण किनवटकर असून त्यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. त्याचबरोबर ते स्वत: आदिवासी कुटुंबातले आहेत. नुकतेच ह्या चित्रपटातील पहिल्या गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि गायिका वैशाली माडे यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. डॉ. राज माने आणि विनोद संतोषराव डवरे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
समाजाने दुर्लक्षित केल्यामुळे आदिवासी लोक कसे व का नक्षलवादी बनतात, ह्या विषयावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असल्याचे चित्रपटाचे निर्माते अरुण किनवटकर यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, ह्या चित्रपटात आदिवासी आणि राजघराण्यातील सुंदर अशी प्रेमकथा दाखवली आहे. त्याच्यावर आधारित ‘माझ्या रानफुला’ असं एक सुंदर रोमँटिक गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आलं. लाखो तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेला सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि गायिका वैशाली माडे ह्यांनी हे गाणं गायले आहे. ह्या गाण्याचे संगीतकार दिनेश अर्जुना आणि गीतकार श्रीकृष्ण राऊत आहेत. ‘माझ्या रानफुला’ हे गाणं माझ्यासाठी आजपर्यंत संगीत दिलेल्या गाण्यांपैकी खूप वेगळं आणि हटके गाणं असल्याचे संगीतकार दिनेश अर्जुना यांनी सांगितले. तर गायिका वैशाली माडे सांगते की, गाण्याचे बोल इतके अप्रतिम आहेत की, हे गाणं गाताना ते आपल्या खूप जवळचे वाटते. तसचं हे गाणं गाताना एक आल्हाददायक अनुभव मिळतो, असे गायक स्वप्नील बांदोडकर म्हणाला.
प्रेमाच्या गुलाबी रंगाने भरलेले हे गाणं ऐकण्याची उत्सुकता अजून वाढलीय असं म्हणायला हरकत नाही. लवकरच ह्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. ऑनलाईन मिस्टेक ह्या चित्रपटात गणेश यादव, रोहन पेडणेकर, प्रल्हाद चव्हाण, विशाल पाटील, आदिती कांबळे, साया काशिद, अस्मिता खटखटे प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच ह्या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन नरेंद पंडित करणार असून, रवि चंदन हे कॅमेरामन असणार आहेत.