पाहा असा आहे Mumbai Pune Mumbai 3 Teaser,स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वेची दिसली अफलातून केमिस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 05:45 PM2018-10-04T17:45:56+5:302018-10-04T17:49:18+5:30
या चित्रपटातील स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीजर प्रेक्षकांना देतो.
पाच वर्षांपूर्वी ‘मुंबई पुणे मुंबई’ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आणि दोन वर्षांपूर्वी आलेल्या व यशस्वी ठरलेल्या त्याच्या सिक्वेलनंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. अशाप्रकारचा मराठीतील हा पहिलाच प्रयत्न असून चित्रपट वर्षाखेर प्रदर्शित होत आहे. ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’च्या या बहुप्रतीक्षित ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाचा टीजर संपूर्ण महाराष्ट्रात गुरुवारी ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातील स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते त्या प्रवासाची स्पष्ट कल्पना हा टीजर प्रेक्षकांना देतो.
‘मुंबई पुणे मुंबई’ पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला आणि त्याने इतिहास रचला. लोकप्रियता, चित्रपटगृह खिडकीवर केलेला व्यवसाय आणि या जोडीच्या घराघरात पोहोचण्याची प्रक्रिया या सर्वच बाबतीत या चित्रपटाने उत्तुंग परिमाणे स्थापित केली. चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपर डुपर हिट ठरला होता. दोन वर्षांपूर्वी जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला तेव्हा या यशाची पुनरावृत्ती झाली. आता हाच इतिहास पुन्हा गिरविला जाणार आहे. निर्माते संजय छाब्रिया आणि सहनिर्माते व ‘52 फ्रायडे सिनेमाज’चे अमित भानुशाली यांनी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासह चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. चित्रपट संपूर्ण राज्यात ७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचा सिक्वेल ‘मुंबई पुणे मुंबई-२’ हा दोन वर्षांपूर्वी दिवाळीत म्हणजे २ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गोवा, गुजरात,कर्नाटक आणि अगदी अमेरिकासारख्या देशांमध्येही चित्रपटाला भरपूर प्रतिसाद लाभला. या चित्रपटाचे शो सॅन फ्रॅन्सिस्को, ह्युस्टन, लॉस एंजेलिस, डेट्रॉइट,सॉल्ट लेक सिटी यांसारख्या परदेशी शहरांमध्येही झाले होते.
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “मुंबई पुणे मुंबई’ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची आता सवय लागून राहिली आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडते आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागून राहिलेली असते.
या जोडप्याच्या आयुष्यात ज्या घोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत. मुंबई पुणे मुंबई’चे चित्रीकरण करत असताना आम्हाला या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असे वाटले नव्हते. पण दुसऱ्या भागाचे चित्रीकरण करत असताना या चित्रपटाच्या पुढच्या भागालाही वाव आहे, हे मात्र स्पष्टपणे जाणवले होते. येणाऱ्या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक काही बोलणे उचित होणार नाही, पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, हा तिसरा भागही तेवढाच यशस्वी ठरणार आहे.”
एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया म्हणाले, “एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि ‘52 फ्रायडे सिनेमाज’चे अमित भानुशाली ही एकमेकांना पूरक अशी नावे आहेत आणि आम्ही आमच्या पहिल्या चित्रपटापासून हे बंध जपले आहेत. हे नाते अधिक घट्ट करताना आम्ही या चित्रपटाचा पुढचा भाग बनविला. चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची निर्मिती करत असताना हे बंध आणि नाते अधिक दृढ होणार आहे. स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे हे गुणी कलाकार आणि गुणवान दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबरोबर काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळत असल्याचा आम्हाला आनंद आहे.”
‘52 फ्रायडे सिनेमाज’चे अमित भानुशाली हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ते म्हणाले, “मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट आम्हाला खूपच प्रिय आहे कारण निर्माते म्हणून तो आमचा पहिला चित्रपट आहे. त्या चित्रपटाच्या तीनही भागांप्रती आमची पालकत्वाची भावना असते. त्याचमुळे यावर्षी येणाऱ्या तिसऱ्या भागाच्या प्रदर्शनाचीही आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की, ‘मुंबई पुणे मुंबई-३’लाही प्रेक्षकांचा तेव्हढाच प्रतिसाद लाभेल.”
‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्याची अनेक भारतीय भाषांमध्ये पुनःर्निर्मिती झाली. या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरासिकांकडून झाली. प्रेक्षकांनी केलेल्या विनंतीला मान देवून या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती केली गेली होती. स्वप्नील आणि मुक्ता ही जोडी रसिकांना खूपच भावली होती. दोन्ही चित्रपटांना सिनेरसिकांकडून फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता. ही बाब बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने केलेल्या व्यवसायातूनही स्पष्ट झाली होती. चित्रपटाची ओळख त्याचे गुणी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यामुळेही आहे. त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. चित्रपटाच्या या तिसऱ्या भागातही स्वप्नील व मुक्ता ही हिट जोडी प्रमुख भूमिकेत आहे.
एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या नावावर अनेक हिट मराठी चित्रपटांची नोंद आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई-२, बापजन्म आणि आम्ही दोघी यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि त्यांचे सादरीकरण कंपनीने केले आहे.
-