स्वप्नील जोशी- मुक्ता बर्वेचा ‘मुंबई पुणे मुंबई-३' 'या' गोष्टीमुळे आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 07:15 AM2018-12-07T07:15:00+5:302018-12-07T07:15:00+5:30
‘मुंबई पुणे मुंबई- ३’ या चित्रपटाचा तिसरा भाग आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई पुणे मुंबई’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.
मुंबई पुणे मुंबई’ हा चित्रपट बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ तीन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आताही ही यशोगाथा पुन्हा लिहिली जाणार आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडेंच्या या चित्रपटांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता ‘मुंबई पुणे मुंबई- ३’ या चित्रपटाचा तिसरा भाग आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई पुणे मुंबई’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.
‘मुंबई पुणे मुंबई-३’ या चित्रपटात स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या लोकप्रिय जोडीने रेखाटलेल्या जोडप्याच्या आयुष्यात पुढे काय घडते हे पाहण्याची उत्कंठा सिनेरसिकांना लागून राहिली आहे. चित्रपटाशी घट्ट जोडल्या गेलेल्या या नावांसह ‘मुंबई पुणे मुंबई ३’मध्ये आणखीही दिग्गज कलाकार जोडले गेले आहेत. रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या या चित्रपटात स्वप्नील-मुक्ताने साकारलेल्या गौतम-गौरी यांच्या आयुष्यात पुढे काय घडते, हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे प्रदर्शित झाल्याने या जोडीच्या पुढील प्रवासाचा अंदाज रसिकांना आला असला, तरी तो प्रत्यक्ष पाहण्याची मजा काही औरच असेल आणि त्याचमुळे उत्कंठा वाढली आहे.
‘मुंबई पुणे मुंबई ३’ चित्रपटामधील ‘आई तू बाबा मी होणार गं...कुणी येणार गं...’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. हे गाणे पारंपारिक डोहाळजेवण (आता त्याला बेबी शॉवर असेही म्हणतात) समारंभातील असून ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावर घराघरात पोहोचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. हे गाणे हृषीकेश रानडे, आनंदी जोशी, सई टेंभेकर, जयदीप बागवाडकर, वर्षा भावे, योगिता गोडबोले आणि मंदार आपटे यांनी गायले आहे. या गाण्याला संपूर्ण नवा साज असून कानाला भावेल असे संगीत निलेश मोहरीर यांनी दिले आहे. देवयानी कर्वे-कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले की, “मुंबई पुणे मुंबई’ला एवढे यश मिळेल असे आम्हाला सुरुवातीला वाटलेच नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई’ हा आता एक वेगळा ट्रेंड झाला असून प्रेमकथेचा एक वेगळा बाज त्यातून गिरवला गेला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची आता सवय लागून राहिली आहे. आता लोकांना गौतम आणि गौरी यांच्या आयुष्यात काय घडते आहे, त्याबद्दल जिज्ञासा लागून राहिलेली असते. या जोडप्याच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यांचा संबंध लोक आपल्या आयुष्याशी जोडू लागले आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई’चे चित्रीकरण करत असताना आम्हाला या चित्रपटाचा पुढचा भाग येईल असे वाटले नव्हते. पण दुसऱ्या भागाचे चित्रीकरण करत असताना या चित्रपटाच्या पुढच्या भागालाही वाव आहे, हे मात्र स्पष्टपणे जाणवले होते. येणाऱ्या चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक काही बोलणे उचित होणार नाही, पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, हा तिसरा भागही तेवढाच यशस्वी ठरणार आहे.”
‘मुंबई पुणे मुंबई-३ चित्रपटाची निर्मिती ‘एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट’च्या संजय छाब्रिया यांनी केली असून चित्रपटाचे सहनिर्माते ‘52 फ्रायडे सिनेमाज’चे अमित भानुशाली आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या नावावर अनेक हिट मराठी चित्रपटांची नोंद आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई-२, बापजन्म आणि आम्ही दोघी यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि त्यांचे सादरीकरण कंपनीने केले आहे.