"तब्बल ९ महिन्यांनी तुम्ही भूलोकी आलात याचा आनंद, पण...", सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर स्वप्नील जोशीची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:44 IST2025-03-19T16:43:38+5:302025-03-19T16:44:06+5:30
मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने सुनिता विल्यम्स सुखरुप परतल्यानंतर खास पोस्ट शेअर केली आहे.

"तब्बल ९ महिन्यांनी तुम्ही भूलोकी आलात याचा आनंद, पण...", सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर स्वप्नील जोशीची पोस्ट
भारतीय वंशाच्या नासाच्या साहसी अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतल्या. अखेर ज्या क्षणाची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यावर सुनीता स्पेसमधून सुखरुप परतल्या. जगभरातून सुनीता विल्यम्स यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या धाडसाचं कौतुक होत आहे. मराठी अभिनेता स्वप्नील जोशीने सुनिता विल्यम्स सुखरुप परतल्यानंतर खास पोस्ट शेअर केली आहे.
स्वप्नील जोशीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सुनीता विल्यम्स आणि टीमचे अंतराळातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे. "Welcome Home सुनीता विल्यम्स ! तब्बल 9 महिन्यांनी तुम्ही आज भूलोकी परतल्याचा सगळ्यांना आनंद तर आहेच, पण तुमच्या जिद्दीला सलाम आहे! माझ्यासाठी आणि संपूर्ण भारतासाठी हा क्षण नक्कीच अभिमानाचा आणि तितकाच खास आहे !", असं स्वप्नीलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर तब्बल ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांचे फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग झाले. हे दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले. भारतीयांनी याशिवाय जगभरातील वैज्ञानिक, संशोधक आणि सामान्य माणसांनी सुनीता पृथ्वीवर परत आल्याने आनंद व्यक्त केलाय.