तुम्ही स्वप्नील जोशीच्या मोगरा फुललाचा टीझर पाहिलात का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 03:26 PM2019-05-28T15:26:08+5:302019-05-28T15:29:21+5:30
स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
श्राबनी देवधर दिग्दर्शित आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (जीसिम्स)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. स्वप्निल जोशी आता एकदम नव्या लूकमध्ये या चित्रपटात प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्वप्निल जोशीच्या नव्या अवतारामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ओळखीच्या चेहऱ्याची पुन्हा नव्याने ओळख या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
श्राबनी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ सिनेमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझर मध्ये स्वप्नील जोशी वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. लग्न होत नसलेला तरी आईवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलाच्या भूमिकेत स्वप्नील पाहायला मिळत आहे. तसेच नीना कुलकर्णी, संदीप पाठक, चंद्रकांत कुलकर्णी यांच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमातून अभिनेत्री सई देवधर मराठी सिनेमात झळकणार आहे.
‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशाणदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जीसिम्स फिल्म्स’ने आतापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात फुगे, तुला कळणार नाही, रणांगण यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे, स्टार प्रवाह वरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेची निर्मिती त्याचबरोबर ‘भिकारी’ या चित्रपटची प्रस्तुती देखील ‘जीसिम्सने केली आहे. भारतीय चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असलेल्या ‘पॅनोरमा स्टुडिओज’ने ‘मोगरा फुलला’च्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे.