कॉफी शॉपची भेट अन् रात्री दोन वाजेपर्यंतच्या गप्पा... वाचा, स्वप्निल जोशीच्या दुस-या लग्नाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 08:00 AM2020-10-18T08:00:00+5:302020-10-18T08:00:02+5:30
आज स्वप्निल जोशीचा वाढदिवस...
स्वप्निल जोशी आज त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचा लाडका मितवा बनला आहे. मुली तर त्याच्यावर फिदा आहेत. प्रेक्षकांचा लाडका स्वप्निल जोशी आणि त्याची पत्नी लीना १६ डिसेंबर २०११ ला लग्नाच्या बेडीत अडकले. लीना ही व्यवसायाने डेन्टिस्ट असून ती मुळची औरंगाबादची आहे.
स्वप्नीलचे लीनासोबत हे दुसरे लग्न आहे. अकराव्या वर्गात असताना स्वप्नील आणि त्याची पहिली पत्नी अपर्णा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पुढे त्यांनी लग्नही केले. मात्र फार काळ हे नाते टिकले नाही. लग्नाच्या केवळ चार वर्षांत स्वप्नील आणि अपर्णा विभक्त झाले. 2009 मध्ये तो अपणार्पासून कायदेशीररित्या विभक्त झाला. 2011 मध्ये स्वप्नीलच्या आयुष्यात लीनाचा प्रवेश झाला आणि त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली. या दोघांच्या संसारवेलीवर मुलगी मायरा आणि मुलगा राघव ही दोन गोंडस फुलं उमलली आहेत.
स्वप्निल आणि लीना यांचे अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे त्यांचा रितसर बघण्याचा कार्यक्रम झाला होता. परंतु हा कार्यक्रम काही टिपिकल कांदे-पोह्याचा नव्हता. तर या दोघांची पहिली भेट झाली कॉफी शॉपमध्ये झाली होती. लीना स्वप्निलची वाट बघच कॉफी शॉपमध्ये बसली होती. त्या दिवशी स्वप्निल रात्री साडे अकरा पर्यंत शूटिंग करत होता. शूटिंग संपवून तो लेट नाईट लीनाला भेटायला कॉफी शॉपमध्ये आला. एक मुलगी आपली वाट बघत एवढ्या रात्री थांबते यावरुनच तो इम्प्रेस झाला होता. मग दोघेही मस्त गप्पा मारत होते. त्यांचे पहिल्याच दिवशी असे सूर जुळले की रात्री दोन वाजेपर्यंत ते गप्पा मारत होते. स्वप्निल आणि लीनाने पहिल्याच भेटीत एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. स्वप्निलने लीनाला पहिल्याच भेटीत एक अट घातली होती. त्याने सांगितले होते की, तू लग्नानंतर माझ्या आई-वडिलांसोबत राहावे अशी माझी इच्छा आहे. परंतु स्वप्निल काही बोलण्याच्या आधीच लीनाने या गोष्टीला होकार दिला.
स्वप्निल आणि लीनाचा साखरपुडा हा औरंगाबादमध्ये झाला होता. पण पाऊस खूप असल्याने स्वप्निल आणि त्याचे कुटुंबिय साखरपुड्याला खूपच उशिरा पोहोचले होते. स्वप्निल-लीनाचे लग्न १६ डिसेंबर रोजी ठरले होते. लग्नाचे मंगलमय सूर दोन्ही घरात घुमू लागले होते. लगीनघाई सुरू होती. लग्न अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपले असतानाच लीनाच्या वडिलांचे अचानक निधन झाले. स्वप्निल आणि त्याच्या घरच्यांनी यावेळी लीनाला बराच आधार दिला.
लग्न झाल्यानंतर नवविवाहित जोडी ही नव-याच्याच घरी जाते अशी आपली परंपरा आहे. परंतु यांच्या बाबतीत जरा वेगळेच झाले. पहिल्याच दिवशी हे दोघे लीनाच्या घरी गेले. लीनाच्या घरी या दोघांनीही पहिली रात्र काढली. यावेळी लीनाच्या मित्रमैत्रिणींनी दोघांनाही फार छळले. सर्वजण यांच्या खोलीत रात्री तीन वाजेपर्यंत गाण्यांच्या भेंड्या खेळत होते. शेवटी दोघांनीही झोपण्याचे नाटक केल्यानंतर सर्वजण त्यांच्या खोलीतून बाहेर गेले.