सचिन पिळगांवकरांवर होणाऱ्या ट्रोलिंगवर मानसपुत्र स्वप्नील जोशी म्हणाला, "आम्ही यावर बोलतो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:50 IST2025-01-16T12:49:42+5:302025-01-16T12:50:03+5:30
ट्रोल तेच लोक होतात जे... स्वप्नील जोशी स्पष्टच बोलला

सचिन पिळगांवकरांवर होणाऱ्या ट्रोलिंगवर मानसपुत्र स्वप्नील जोशी म्हणाला, "आम्ही यावर बोलतो..."
महागुरु म्हणून लोकप्रिय असलेले मराठी, हिंदी विश्वातील दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar). मराठी, हिंदी माध्यमात त्यांनी दर्जेदार सिनेमे केले. दिग्दर्शन, निर्मितीही केली. शिवाय ते उत्तम डान्सरही आहेत. 'शोले', 'बालिका वधू' सारख्या हिट सिनेमात ते दिसले. मराठीतही त्यांनी गाजलेले सिनेमांमध्ये काम केलं. इतकं असूनही सचिन पिळगांवकर गेल्या काही वर्षात बरंच ट्रोल होत आहेत. 'एकापेक्षा एक' या डान्स शोमध्ये ते परीक्षक होते. तेव्हापासून त्यांना महागुरु म्हणून सोशल मीडियावरट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) त्यांचा मानसपुत्रच आहे असं म्हटलं जातं. त्याने नुकतंच या सचिनजींवर होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.
'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' ला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नील जोशी म्हणाला, "मला वाटतं की त्याबद्दल माझी जी भावना आहे ती मी सरांकडे व्यक्त करतो आणि ती त्यांना माहितीये. काय करायचं आणि काय नाही करायचं हे ते मला विचारतात आणि मीही त्यांना विचारतो. ट्रोल होणं हे आता कलाकाराच्या आयुष्याचा भागच झालं आहे. तुम्ही ट्रोल होताय म्हणजेच तुम्ही महत्वाचे आहात. कारण तुम्ही जो कलाकार माहितच नाही त्याला ट्रोल करत नाही. काहींना ट्रोल करायला आवडतं तर काहींना फक्त सचिनजींनाच ट्रोल करायचं असतं. काहीही झालं की यांच्यावर खापर फोडा असं ते करतात. सचिनजींचं कामच एवढं मोठं आहे की त्यांनी कधी ट्रोलर्सकडे लक्ष दिलं नाही आणि देणारही नाही. ते यश मिळवण्यात व्यस्त आहेत."
"माझ्यावर होणाऱ्या ट्रोलिंगकडेही मी असाच पाहतो. जोपर्यंत ते ट्रोलिंग वैयक्तिक होत नाही तोवर त्याचा त्रास करुन घेत नाही. जेव्हा ते बायको, मुलांवर येतं तेव्हा नक्कीच त्रास होतो. पण आता इतके वर्ष काम केल्यानंतर इतका समजूतदारपणा तर आलाय की त्याच्याकडे लक्ष न देणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जोपर्यंत माझी सद्सद् विवेकबुद्धी मला सांगते की मी चुकीचं केलेलं नाही तोपर्यंत त्या ट्रोलिंगकडे लङक्ष देत नाही. त्यांना आपलं लक्षच हवं असतं उपाय नको असतो. आजच्या काळात कोण महत्वाचा माणूस ट्रोल होत नाही? जर तुम्ही बातम्यांमध्ये आहात तर तुम्ही ट्रोल होणार. कारण ज्यांना ट्रोल करायचंय त्यांन फक्त मतच मांडायचंय. जातीबाबतीत केलेल्या ट्रोलिंगवर मी बोलत नाही कारण ते माझ्या हातात नाही."