-तर न्यूड फोटो व्हायरल करू..., ‘Takatak 2’मधील अभिनेत्रीला धमकीचे फोन, वाचा काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 04:28 PM2022-12-04T16:28:29+5:302022-12-04T16:30:19+5:30
Takatak 2 : नेमकं काय घडलं? अभिनेत्रीने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
अलीकडे रिलीज झालेला ‘टकाटक 2’ (Takatak 2) हा सिनेमा चांगलाच गाजला. प्रथमेश परब, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत यांच्या महत्वाच्या भूमिका असलेल्या या सिनेमाने दमदार कमाई केली. याच चित्रपटात अंकिता नावाचं पात्र साकारणारी अभिनेत्री कोमल बोडखे ( Komal Bodkhe ) हिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. खुद्द कोमलने एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
कोमल म्हणाली...
कोमलने व्हिडीओ शेअर करत आपबीती सांगितली आहे. तिने सांगितलं, ‘गेल्या काही दिवसांपासून मला एका नंबरवरून फोन येत होते. पण अनोळखी नंबर असल्याने मी तो फोन उचलला नाही. त्यानंतर मग त्यांनी माझ्या भावाला फोन केला. माझ्या भावाने मला याबद्दल सांगितलं. तू कोणत्या अँपवरून पैसे घेतले आहेस का? असं त्याने मला विचारलं. मी नाही असं उत्तर दिलं. त्यावर ते लोक तू घेतलेले पैसे मागत आहेत. ते व्याजही मागत आहे, असं माझा भाऊ म्हणाला. सुरुवातीला मी घाबरले. मग मी त्या नंबरवर फोन केला आणि कोणतंही कर्ज घेतलं नसल्याचं त्यांना स्पष्ट सांगितलं. मी सप्टेंबरपासन घरी नाहीये. मी नाशिकला आहे आणि माझ्याकडे माझं आधारकार्ड आणि कोणतीही कागदपत्र नाहीयेत. सगळं माझ्या आईवडिलांकडे आहेत. शिवाय माझा फोनचा डिसप्ले गेल्या महिन्याभरापासून खराब आहे. मी लोन घेतलेलं नाही, असं त्यांना पटवून सांगितलं. पण इतकं सांगितल्यानंतरही ते थांबले नाहीत. त्यांनी मला माझ्या आधारकार्डचे डिटेल्स पाठवले. इतकंच नाही तर तू पैसे भरले नाहीत तर तुझे न्यूड फोटो व्हायरल करु अशी धमकी सुद्धा दिली. मग मात्र मी घाबरले.
मी माझ्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. त्यांनी मला अकाउंट चेक करायला सांगितलं. मी चेक केल्यावर माझ्या एका खात्यात 2 हजार पेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आल्याचं मला समजलं. पण मी कोणत्याही अँपवरून लोन घेतलंच नव्हतं. शेवटी मी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.’
अशा प्रकारापासून सावध व सतर्क राहण्याचं आवाहनही तिने केलं. ‘गेल्या काही दिवसांपासून हे असे प्रकार इथे सर्रास सुरू आहेत. त्यामुळे कृपया असे कोणतेही अँप डाऊनलोड करु नका. यामुळे तुमचे बँक अकाउंट डिटेल्स त्यांच्याकडे जातील आणि ते लोक याचा गैरफायदा घेतील. तुमची अशी फसवणूक होऊ नये यासाठी सावध राहा, असं ती म्हणाली.