Takatak 2 Marathi Movie Review : प्रथमेश परबची 'टकाटक' कॉमेडी, सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 05:02 PM2022-08-18T17:02:43+5:302022-08-18T17:03:23+5:30

Prathamesh Parab's Takatak 2 Movie Review: जाणून घ्या कसा आहे, प्रथमेश परबचा 'टकाटक २' चित्रपट

Takatak 2 Marathi Movie Review : Prathamesh Parab's 'Takatak' comedy, read this review before watching the movie | Takatak 2 Marathi Movie Review : प्रथमेश परबची 'टकाटक' कॉमेडी, सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

Takatak 2 Marathi Movie Review : प्रथमेश परबची 'टकाटक' कॉमेडी, सिनेमा पाहण्यापूर्वी वाचा हा रिव्ह्यू

googlenewsNext

कलाकार : प्रथमेश परब, भूमिका कदम, अजिंक्य राऊत, कोमल बोडखे, अक्षय केळकर, प्रणाली भालेराव, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, पंकज विष्णू, किरण माने, स्मिता डोंगरे, तुषार माने, ऋषी मच्छे, अक्षय जाधव, मयूरी आव्हाड
दिग्दर्शक : मिलंद कवडे
निर्माते : ओम प्रकाश भट्ट, आदित्य जोशी, नरेश चौधरी, रिलायन्स एन्टरटेन्मेंट
शैली : रोमँटिक अॅडल्ट कॅामेडी
कालावधी : दोन तास ११ मिनिटे
स्टार - साडे तीन स्टार
चित्रपट परीक्षण - संजय घावरे


'टकाटक'प्रमाणे 'टकाटक २'सुद्धा अॅडल्ट-कॉमेडी असला तरी महत्त्वपूर्ण संदेश देणारा आहे. थिल्लरपणा न करता तरुणाईला त्यांच्याच भाषेत महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न यातही केला गेला आहे. अॅडल्ट-कॉमेडी म्हटल्यावर कित्येकदा केवळ थिल्लरपणा, शिवीगाळ, अश्लील भाषा असा समज होतो, पण यात आक्षेपार्ह असणारे संवाद म्यूट करण्यात आले आहेत. प्रत्येकानं आपापल्या विचारसरणीनुसार अर्थ समजून घ्यावा अशाप्रकारे डबल मिनिंग संवादांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे दिग्दर्शक मिलिंद कवडेनं पुन्हा एकदा तरुणाईसोबत सर्व रसिकांची नाडी अचूक पकडल्याचं म्हणता येईल.

गण्या, शऱ्या आणि चंदू या तीन मित्रांची ही गोष्ट आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तिघांचा मिनी, अंकिता आणि कामाक्षी या त्याच कॅालेजमधील तीन तरुणींवर जीव जडतो. सुरुवातीला गंमत म्हणून प्रेम करणारे तिघेही खरोखर तिघींवर प्रेम करू लागतात, पण प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करताना प्रत्येक वेळी तोंडघशी पडतात. एका कार्यक्रमासाठी गेलेल्या तिघींच्याही मागावर गण्या, शऱ्या आणि चंदूही गोव्यात पोहोचतात. तिथे अंकिताकडे शऱ्या आपले प्रेम व्यक्त करत असतो, पण सर्व घोळ होतो. अखेर तिघेही कसेतरी आपापलं प्रेम व्यक्त करण्यात यशस्वी होतात, पण गंमत म्हणून एक प्लॅनिंग करण्याच्या नादात पुन्हा प्रेम हरवून बसतात. त्यानंतर बदनामी आणि अपमान वाट्याला आल्यावर हे तिघे काय करतात चित्रपटात पहायला मिळतं.

लेखन-दिग्दर्शन : संकल्पना मिलिंदची असून त्यानं चांगल्या प्रकारे सादर केली आहे. लेखनातही बरेच ट्विस्ट आणले असून, दिग्दर्शन नेहमीच्याच शैलीत केलं आहे. पहिल्या चित्रपटाच्या तुलनेत सिक्वेलचं दिग्दर्शन आणखी प्रभावी वाटतं. किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी तरुण मुला-मुलींना भावणारं संवादलेखन करताना इतर वयोगटातील प्रेक्षकांना ते खटकणार नाहीत याची काळजी घेतली आहे. चित्रपटाची भाषा आणि शैली तरुणाईला भावणारी असून, डबल मिनिंग संवाद हास्याची कारंजी फुलवणारी आहेत. अॅडल्ट असलं तरी ते सादर करताना बिभत्स वाटणार नाही याचं भान राखलं आहे. काही दृश्यांचा आपसात आणखी चांगल्या प्रकारे ताळमेळ बसवण्याची गरज असल्याचं चित्रपट पाहताना सारखं वाटत रहातं. कॉलेजमधील वय गमतीजमती करण्याचंच असतं, पण जे काही करायचं ते भान राखून... मुलींबद्दल कितीही वाईट विचार मनात आले तरी लक्ष्मणरेषा ओलांडायची नाही. मैत्रीत कितीही दुरावा निर्माण झाला तरी त्यातील गोडवा कमी होऊ द्यायचा नाही. अडचणीत असलेल्या मित्राला मित्रानेच हात द्यायचा. सावत्र आईसुद्धा सख्ख्या आईप्रमाणे माया करू शकते असे बरेच मुद्दे या चित्रपटात हाताळण्यात आले आहेत. फक्त पॅकेजिंग अॅडल्ट-कॉमेडीचं असल्यानं त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. 'हृदयी वसंत फुलताना...' हे गाणं जुनं तेच सोनं याची जाणीव करून देते. कॅमेरावर्क, संकलन, कला दिग्दर्शन चांगलं आहे.

अभिनय : प्रथमेश परबनं पुन्हा एकदा विनोदी आणि भावनिक सीन अत्यंत सुरेखरीत्या सादर केले आहेत. त्यानं साकारलेला ठोक्या कॉमेडीसोबतच विचारांसाठीही लक्षात राहील. अजिंक्य राऊत आणि अक्षय केळकर यांनीही मुख्य भूमिकेत मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. भूमिका कदम आणि कोमल बोडखे यांनी बोल्ड सीन्ससोबत अभिनयही चांगला केला आहे. प्रणाली भालेरावनं बोल्ड दृश्यांपेक्षा अभिनयावर आणखी लक्ष केंद्रित करायला हवे. गबाळ्याच्या भूमिकेत सुशांत दिवेकरनं उत्तम फटकेबाजी केली आहे. स्मिता डोंगरे यांनी ठोक्याच्या आईच्या भूमिकेतील विविध पैलू सादर केले आहेत. स्वप्नील राजशेखरसारख्या कलावंताला फार काम नाही. व्रात्य मुलांवरही विश्वास दाखवणाऱ्या प्रोफेसरची भूमिका पंकज विष्णूनं साकारली आहे. 

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

सकारात्मक बाजू : कलाकारांचा अभिनय, विचार करायला लावणारे मुद्दे, तरुणांच्या भाषेत सांगितलेल्या मार्गदर्शक ठराव्या अशा गोष्टी, गीत-संगीत, कॅमेरावर्क.

नकारात्मक बाजू : डबल मिनिंग संवाद आणि पॅकिंग वेगळं असल्यानं चित्रपट पाहिल्याशिवाय यात काय दाखवण्यात आलं हे समजणार नाही.

थोडक्यात : हा चित्रपट म्हणजे केवळ थिल्लरपणा नसून, याद्वारे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरुणाई तर हा चित्रपट पाहिलच, पण इतरांनीही एकदा पहायला हरकत नाही.

Web Title: Takatak 2 Marathi Movie Review : Prathamesh Parab's 'Takatak' comedy, read this review before watching the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.