Video: 'टकाटक 2' म्हणत सुबोध भावेने लॉन्च केला चित्रपटाचा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 05:27 PM2022-08-10T17:27:35+5:302022-08-10T17:28:15+5:30
Takatak 2: नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या संकल्पनेतून 'टकाटक २' हा चित्रपट तयार झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'टकाटक 2' या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अलिकडेच या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामुळे या चित्रपटाविषयी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली होती. यामध्येच आता अभिनेता सुबोध भावे याच्या हस्ते 'टकाटक 2' चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.
''टकाटक 2'चा ट्रेलर प्रदर्शित करत असताना सुबोध भावेने 'टकाटक'च्या आठवणींना उजाळा देत संपूर्ण टीमचं कौतुक केलं. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये चित्रपटाची थोडीशी झलक दाखवण्यात आली आहे. या ट्रेलरमध्ये कलाकारांचे संवाद, अभिनय आणि गाणी यामुळे हा ट्रेलर लोकप्रिय होताना दिसत आहे.
नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या संकल्पनेतून 'टकाटक २' हा चित्रपट तयार झाला आहे. याची कथा आणि पटकथाही मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे. मित्रांचा ग्रुप, त्यांची धमाल-मस्ती, त्यांच्यातील मिश्किल संवाद, विनोदी आणि भावूक प्रसंग, मनोरंजक गाणी, पंचेस असलेली डायलॅागबाजी आणि या जोडीला पुन्हा काहीतरी वेगळा विचार घेऊन आल्याची चाहूल हा 'टकाटक २'च्या ट्रेलरचा प्लस पॅाईंट आहे.
'मैत्रीसाठी काय पण...' असं म्हणत जीवाला जीव देणाऱ्या मित्रांची कथा मांडताना अॅडल्ट-कॅामेडी असली तरी समतोल राखून बनवलेला चित्रपट 'टकाटक २'च्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टकाटक २'च्या ट्रेलरला अल्पावधीतच प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, या चित्रपटात प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकार आहेत. 'टकाटक २'ची निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.