आता जगात फक्त मराठीच वाजणार! ‘तांबडी चामडी’चा डंका, गाणं जगभरात झालं प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 04:08 PM2024-08-27T16:08:52+5:302024-08-27T16:10:12+5:30
‘तांबडी चामडी’ हे मराठी गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. आता हे गाणं केवळ देशातच नाही तर जगभरात वाजणार आहे. जगभरातील लोक हे मराठी गाणं आता बघू आणि ऐकू शकणार आहेत.
सोशल मीडियावर दररोज गाण्याचा ट्रेंड बदलत असल्याचं पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मराठी गाणी प्रचंड व्हायरल झाली आहेत. 'गुलाबी साडी', 'आप्पाचा विषय लय हार्ड ए' या गाण्यांनंतर आता ‘तांबडी चामडी’ हे मराठी गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील्स व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. अनेक कलाकारांनाही तांबडी चामडीवर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता हे गाणं केवळ देशातच नाही तर जगभरात वाजणार आहे. स्पिनिंग रेकॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय संगीत कंपनीच्या ऑफिशल चॅनेलवर ‘तांबडी चामडी’ हे गाणं प्रदर्शित झाल आहे. त्यामुळे जगभरातील लोक हे मराठी गाणं आता बघू आणि ऐकू शकणार आहेत.
‘तांबडी चामडी’ हे गाणं श्रेयस सागवेकर याने लिहिलं आहे. तर कृणाल घोरपडे याने या गाण्याला संगीत दिलं आहे. या गाण्याद्वारे त्याने संगीतसृष्टीत पदार्पण केलं आहे. या गाण्याची निर्मिती वर्ल्ड ऑफ वाइब्ज आणि रॉक कच्ची यांनी केली आहे. तेजस शेट्ये, मनीष शेट्ये, वृशाली शेट्ये, निनाद सावंत, आकाश साळुंखे, माटिन शेख, मल्हार जाधव, यश माधव, रूपेश किंगरे, अवंतिका चौघुले, आशिष नेगी, धनंजय जाधव आणि अनिकेत सोंडे या कलाकारांनी या गाण्यात अभिनय केला आहे.
‘तांबडी चामडी’ गाण्याविषयी संगीतकार क्रेटेक्स(कृणाल घोरपडे) सांगतो, “माझा आनंद गगनात मावत नाहीये. माझं स्वप्न होतं की माझं गाणं स्पिनिंग रेकॉर्डस चॅनेलवर कधीतरी यावं. ज्या रेकॉर्ड लेबलवरती जगभरातील डेव्हिड ग्वेट, मार्टिन गॅरिक्स, अफ्रोजॅक, डिमिट्री व्हेग्स एंड लाइक माइक, हार्डवेल, स्टीव्हओकी अश्या सुप्रसिद्ध कलाकारांची गाणी या आधी प्रदर्शित झाली आहेत. आणि आता या विविध भाषेमधील गाण्यांमध्ये आपलं मराठी गाणं प्रदर्शित होणं, ही माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. या गाण्याच्या ऑडिओला भारतातच नव्हे तर जगभरात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही व्हिडीओच्या स्वरूपात हे गाणं तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. आणि आता लवकरच मी परदेशात मराठी गाण्याचे शो करत आहे. प्रेक्षकांचं प्रेम कायम असंच राहो. आणि मराठी भाषा, मराठी गाणी देशात नव्हे तर परदेशातही वाजू दे हीच सदिच्छा”.