"मराठी सिनेमा संपवला जातोय...", TDM चित्रपटाला शोज मिळेना; अभिनेत्याला अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 09:24 AM2023-05-02T09:24:44+5:302023-05-02T10:16:19+5:30
दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंच्या TDM सिनेमाच्या टीमने प्रेक्षकांसमोर हात जोडले.
गेल्या काही दिवसात मराठी सिनेमांनी भरारी घेतली आहे. 'वेड, 'वाळवी', 'झिम्मा' सारख्या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांची गर्दी खेचून आणली. आता भाऊराव कऱ्हाडे यांचा टीडीएम (TDM) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. तर दुसरीकडे केदार शिंदेंचा 'महाराष्ट्र शाहीर'ही याचवेळेस रिलीज झाला. महाराष्ट्र शाहीर पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होताना दिसतीए मात्र 'टीडीएम'ला पुरेसे शोज मिळालेले नाहीत. अतिशय कष्टाने सिनेमा बनवून तो दाखवताच येत नाहीए, मराठी सिनेमा संपवला जातोय अशी खंत भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे.
28 एप्रिल रोजी TDM संपूर्ण राज्यात रिलीज झाला. मात्र सिनेमाला फार कमी शोज लावण्यात आले आह. पुण्यात जिथे कलेचे अनेक रसिक आहेत तिथे तर केवळ एकच शो दिला गेला. रसिकांना सिनेमा पाहायचा आहे मात्र शोज नसल्याने त्यांना माघारी जावं लागत आहे. सिनेमाच्या टीमने एका थिएटरमध्ये भेट दिली तेव्हा मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरातला अक्षरश: रडू कोसळलं.
पृथ्वीराज म्हणाला,"तुम्हीच आपला मराठी सिनेमा मोठा करु शकता. आम्ही एवढ्या मेहनतीने सिनेमा बनवला आहे त्याचं चीज करणं तुमच्याच हातात आहे. तुम्ही सिनेमा पाहा आणि मग ठरवा चांगला आहे की वाईट." हे बोलताना पृथ्वीराज भावूक झाला होता तसंच त्याला रडू कोसळलं.
दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपली व्यथा मांडली. यावेळी सर्व टीमने प्रेक्षकांना हात जोडून चित्रपट पाहण्याची विनंती केली. सर्वांनाच यावेळी अश्रू अनावर झाले होते.