अभिनेता किरण गायकवाडचा 'नाद' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:09 PM2024-09-27T18:09:55+5:302024-09-27T18:12:28+5:30
Naad Movie : घोषणा झाल्यापासून 'नाद - द हार्ड लव्ह' हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर या चित्रपटाचा लक्षवेधी टिझर रसिकांच्या भेटीला आला आहे.
घोषणा झाल्यापासून 'नाद - द हार्ड लव्ह' (Naad - The Hard Love) हा मराठी चित्रपट सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर या चित्रपटाचा लक्षवेधी टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे. 'नाद'चा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. 'नाद'मध्ये प्रेक्षकांना एक संगीतमय प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. 'नाद' हा चित्रपट २५ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी 'नाद - द हार्ड लव्ह' चित्रपटाची निर्मिती केली आहे. रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक आहेत. 'नाद'चं दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. टीझरची सुरुवातच मूळात 'नाद'ची व्याख्या सांगणारी आहे. गावाकडच्या लाल मातीतून नागमोडी वाट काढत जाणारा काळाभोर डांबरी रस्ता आणि त्यावर बुलेटची सवारी करणारा नायक लक्ष वेधून घेतो. दुसरीकडे शीर्षकाची व्याख्या उलगडत जाते. 'नाद' म्हणजेच ध्यास जेव्हा श्वासातून रक्तात उतरतो, तेव्हा काय होते ते टीझरमध्ये सांगितले आहे. थोडक्यात काय तर गावाकडच्या लाल मातीत, हिरवा शालू नेसलेल्या शेतात रंगलेली रांगडी प्रेमकथा 'नाद'मध्ये पाहायला मिळणार असल्याचं टिझर पाहिल्यावर जाणवते.
'नाद'ची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी, तर पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केले आहे. वैभव देशमुख यांच्या साथीने विनायक पवार यांनी गीतलेखनही केलं असून ही सर्व गाणी संगीतकार पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केली आहेत. 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड आणि सपना माने या नव्या कोऱ्या जोडीची अनोखी केमिस्ट्री या चित्रपटात रसिकांना भुरळ पाडणार आहे. याखेरीज यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग आदी कलाकारांनीही या चित्रपटामध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. डिओपी अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, सतीश चिपकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. सिद्धेश दळवीने कोरिओग्राफी, तर निगार शेख यांनी वेशभूषा केली आहे. सुजित मुकटे कार्यकारी निर्माते असून आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. रमेश शेट्टी या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून संकेत चव्हाण लाइन प्रोड्युसर आहेत.