सिनेमागृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित होणार तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’, मराठीत पहिल्यांदाच नवा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 13:24 IST2024-12-17T13:24:10+5:302024-12-17T13:24:40+5:30

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा चित्रपटगृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.  या चित्रपटाचा भव्य प्रीमियर २० डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे.

tejashree pradhan and subodh bhave marathi movie hashtag tadev lagnam premiere in natyagruh | सिनेमागृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित होणार तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’, मराठीत पहिल्यांदाच नवा प्रयोग

सिनेमागृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित होणार तेजश्री-सुबोधचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’, मराठीत पहिल्यांदाच नवा प्रयोग

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेला ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत नवा प्रयोग केला जात आहे. ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा सिनेमा चित्रपटगृहात नाही तर नाट्यगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.  या चित्रपटाचा भव्य प्रीमियर २० डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. चित्रपटातील कलाकार सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या उपस्थितीत हा खास कार्यक्रम होणार असून या ऐतिहासिक प्रीमियरसाठी विनामूल्य प्रवेश असून नाट्यगृहातच तिकीट उपलब्ध होणार आहेत. 

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ हा चित्रपट लग्नसंस्थेवर आधारित असून, आधुनिक विचारसरणी यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अथश्री आणि गायत्री ही दोन परस्परविरोधी स्वभावाची पात्रे एकमेकांना पहिल्यांदा भेटतात आणि त्यांच्या पहिल्या भेटीतून काही मजेदार काही भावनिक घटना घडतात. त्यांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीतून काही रहस्ये देखील समोर येतात, ज्यामुळे कथा अधिक मनोरंजक बनते.

चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आनंद गोखले म्हणतात, "मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये नेहमीच मर्यादित स्क्रीन मिळतात. त्यामुळे आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. नाट्यगृहात चित्रपट प्रदर्शित करणं हा एक आव्हानात्मक निर्णय आहे आणि हे आव्हान आम्ही पेललं आहे. या पद्धतीने आम्ही अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू आणि त्यांना एक नवा अनुभव देऊ शकू. नाट्यगृहातील या भव्य प्रीमियरसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत". 

चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते म्हणाले की हा चित्रपट प्रायोगिक तत्वावर असून पूर्वनियोजित नाटकांच्या खेळांना कोणत्याही प्रकारचा धक्का न लागू देता नाट्यगृहामध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. तसेच यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांना मराठी चित्रपट व नाटक या दोन्हीचा आस्वाद एकाच ठिकाणी घेता येईल.

‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटात प्रथमच प्रेक्षकांना सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. या प्रमुख कलाकारांसोबत प्रदीप वेलणकर, मानसी मागिकर, संजय खापरे, आणि शर्मिष्ठा राऊत हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शुभम फिल्म प्रॅाडक्शन निर्मित, आनंद दिलीप गोखले लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत.

Web Title: tejashree pradhan and subodh bhave marathi movie hashtag tadev lagnam premiere in natyagruh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.