Exclusive: "प्रेक्षकांना सिनेमा बघायचा आहे पण...", तेजश्री प्रधानने व्यक्त केली खंत; नक्की काय म्हणाली?
By ऋचा वझे | Updated: December 27, 2024 12:44 IST2024-12-27T12:43:51+5:302024-12-27T12:44:47+5:30
'हॅशटॅग तदेव लग्नम्' मराठी सिनेमा नुकताच २० डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. मात्र सिनेमाला पुरेसे थिएटर्सच मिळालेली नाहीत. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि दिग्दर्शक आनंद गोखले यांनी याबाबत 'लोकमत फिल्मी' शी सविस्तर संवाद साधला आहे.

Exclusive: "प्रेक्षकांना सिनेमा बघायचा आहे पण...", तेजश्री प्रधानने व्यक्त केली खंत; नक्की काय म्हणाली?
तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) आणि सुबोध भावे अभिनीत 'हॅशटॅग तदेव लग्नम्' (Hashtag Tadev Lagnam) सिनेमा नुकताच २० डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला. मराठी प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये येत नाहीत अशी नेहमीच तक्रार होते. मात्र इथे प्रेक्षकांना यायचं असूनही अनेक थिएटर्समध्ये शोच नाहीएत. जिथे सिनेमा लागला आहे तिथे जेमतेम एक स्क्रीन मिळाली आहे. याबाबतीत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि दिग्दर्शक आनंद गोखले यांनी 'लोकमत फिल्मी' शी सविस्तर संवाद साधला आहे.
सिनेमाला पुरेसे स्क्रीन्सच मिळालेले दिसत नाहीत असं चित्र आहे. तुला नक्की काय प्रतिक्रिया येत आहेत?
तेजश्री प्रधान - हे खूपच वाईट आहे. अनेकांचे मला फोन येत आहेत की आम्हाला सिनेमा पाहायचा आहे. मात्र आमच्या जवळच्या थिएटरमध्ये सिनेमा लागलेलाच नाही. प्रेक्षकांचंही बरोबरच आहे. नेहमी मराठी प्रेक्षक बाहेर पडत नाहीत असंच आपण म्हणतो. आमचा सिनेमा चांगला आहे, लोकांना पाहायची इच्छा आहे पण जर थिएटरमध्ये तो लागलाच नसेल तर ते तरी काय करणार? यामुळे मोठी खंत वाटते. असं चित्र असेल तर मराठी सिनेमा कसा चालणार? इतका पाठपुरावा केल्यानंतर आज आम्हाला विले पार्ले येथे एक शो मिळाला आहे. जिथे मराठी प्रेक्षक राहतात तिथल्या थिएटरमध्येही सिनेमा लागला नसणं हे खरंच दुर्दैव आहे.
यावर उपाय काय?
तेजश्री प्रधान - जवळपास सगळ्याच कलाकारांची एक मागणी आहे की मराठी सिनेमांसाठी स्वतंत्र थिएटर्स असावीत. आता ही गरजच आहे. स्पर्धाही वाढली आहे. हिंदीसोबत साऊथच्याही सिनेमांची क्रेझ आहे. तेही सिनेमे बघावेत मी नाही म्हणत नाही. पण यात मराठी सिनेमाही मागे पडता कामा नये. त्यासाठी स्वतंत्र थिएटर मिळाले तर अशा प्रकारे 'स्क्रीन द्या' असं म्हणायची वेळच येणार नाही.
सिनेमा रिलीज झाल्यानंतर फारसे स्क्रीन मिळाले नाहीत. यामागचं कारण काय?
दिग्दर्शक आनंद गोखले - ठरलेली सर्व स्क्रीन्स मिळाली नाहीत. कारण 'पुष्पा २' अजूनही थिएटरमध्ये चालत आहे. त्यातच 'बेबी जॉन' हा हिंदी सिनेमाही रिलीज झाला. यामुळे आपल्या सिनेमांवर परिणाम होतो हे सत्य आहे. तरी आता आमच्या सिनेमाची माऊथ पब्लिसिटी होत आहे. त्यामुळे हळूहळू शोज वाढतील अशी आम्हाला आशा आहे. आम्ही सतत त्यासाठी पाठपुरावा करत आहोत. नुकताच मुंबईतल्या विले पार्लेमध्ये आता स्क्रीन मिळाली आहे. हे चित्र बदलेल अशीच अपेक्षा आहे. खरंतर 'हॅशटॅग तदेव लग्नम' ऑक्टोबर महिन्यात रिलीज करणार होतो. तो पुढे पुढे करत आम्ही अखेर डिसेंबरमध्ये रिलीज केला. तरी आम्हाला स्क्रीन्स मिळू शकत नाहीत ही खंत वाटते. याशिवाय आम्ही नाट्यगृहातही सिनेमा प्रदर्शित करतोय. हाही एक प्रयोग करत आहोत. लवकरच पुण्यातील बालगंधर्व मध्ये सिनेमा रिलीज करावा असा प्लॅन सुरु आहे.
तुझा 'ती सध्या काय करते' खूप चालला होता. तेव्हाचं चित्र कसं वेगळं होतं?
तेजश्री प्रधान - २०१७ साली 'ती सध्या काय करते' आला होता. तो सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता. प्रेक्षकांनी गर्दीही केली होती. तेव्हाचा काळ मराठी सिनेमासाठी चांगलाच होता असं मी म्हणेन. कारण त्याआधीच 'सैराट' आला होता जो तुफान चालला. आताही मराठी सिनेमे चालत आहेत पण थिएटर्ससाठी झगडावं लागत आहे. हे चित्र बदललं पाहिजे.