घटस्फोटानंतर समाजाच्या प्रश्नांचा सामना कसा केलास? तेजश्री प्रधान म्हणाली, "माझ्या आयुष्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 15:26 IST2025-01-26T15:26:26+5:302025-01-26T15:26:47+5:30
तेजश्रीने वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. काही वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. याला ती कशी सामोरी गेली याबद्दल तेजश्री भरभरुन बोलली आहे.

घटस्फोटानंतर समाजाच्या प्रश्नांचा सामना कसा केलास? तेजश्री प्रधान म्हणाली, "माझ्या आयुष्यात..."
अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) महराष्ट्रातील प्रेक्षकांची अतिशय लाडकी आहे. नुकतीच ती 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमात दिसली. सुबोध भावेसोबत तिची जोडी होती. प्रेक्षकांना सिनेमा खूप आवडला. दरम्यान तेजश्रीने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे. तेजश्रीने वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. काही वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. याला ती कशी सामोरी गेली याबद्दल तेजश्री भरभरुन बोलली आहे.
घटस्फोटानंतर समाजाच्या प्रश्नांना तेजश्री कशी सामोरी गेली असा प्रश्न तिला विचारण्यात आला.'मुक्कामपोस्ट मनोरंजन'ला दिलेल्या मुलाखतीत तेजश्री प्रधान म्हणाली, "मला वाटतं अशा परिस्थितीत दैवत तुम्हाला बळ देतं. ती येतेच तुमच्यात. जेव्हा तुम्हाला वाटतं की काहीतरी चुकतंय तेव्हा ते बळ येतं आणि तुम्ही करुन मोकळे होता. आज विचार केला तर त्या गोष्टी आता अवघड वाटतात. त्यामुळे ते बळ त्या त्या परिस्थितीत येते, तिची गरज संपली की कमी होऊन जाते असं मला वाटतं."
"दोन चांगली माणसं प्रत्येक वेळी चांगले जीवनसाथी असतीलच असं नाही. आजकाल आपण या विषयांवर अगदी सहज बोलतो म्हणून मला सांगायला आवडेल की एक महत्वाची गोष्ट जी मी माझ्या बाबतीत केली ती म्हणजे माझ्या आयुष्यात जे घडलं त्यासाठी मी त्या माणसाला दोष देणार नाही. मला काहीतरी महान बोलायचंय म्हणून नाही तर माणूस म्हणून सांगते की ज्याने आपल्याला दुखावलंय किंवा जो व्यक्ती माझ्यामुळे दुखावलाय तर या दोन माणसांमध्ये आपण त्या माणसाला इतकं महत्व द्यायचंच नाही की आपल्या आयुष्यात एवढी मोठी गोष्ट त्याच्यामुळे झालीये. जे झालंय ते माझ्या नशिबात होतं, ते होणार होतंच. त्यासाठी मी दुसऱ्याला दोष देऊन त्या माणसाला मोठं करते. आज माझ्या आयुष्यात जे होतंय त्यासाठी मी समोरच्याला का जबाबदार धरु? हे माझं आयुष्य आहे आणि मोलाचं आहे. त्यात जे घडतंय ते माझ्या इच्छेने आणि धैर्याने घडतंय. तुम्ही एवढे महत्वाचे निर्णय घेता तेव्हा ती सोपी गोष्ट नसते. लोक बोलतच राहतात, स्वयंघोषित शेजारी असतात अशी माणसं विशेषच असतात. आपल्या आयुष्यात काय चाललंय हे बघायला समाजाला खूप वेळ आहे. एखादं नातं तुटणं ही वाईट गोष्ट आहे आणि ती दोन्ही कुटुंबासाठी वाईटच गोष्ट असते. त्यामुळे तुम्ही नका आमच्या घरात शिरु. आम्ही तुमच्या घरात डोकवायला येतो का?"