संसदेतून १४१ खासदारांचं निलंबन, तेजस्विनी पंडित संतापली; म्हणाली, "हुकूमशाहीचा उदय की...."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 08:08 PM2023-12-19T20:08:29+5:302023-12-19T20:08:58+5:30
"चला बिलं पास करून घ्या पटापट", १४१ खासदारांच्या निलंबनानंतर तेजस्विनीची पोस्ट
संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे पुन्हा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ४९ खासदारांचं निलंबन करण्यात आलं. संसदेत आक्रमक झालेल्या खासदारांच्या निलंबनाचं सत्र सुरूच असून आतापर्यंत जवळपास १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यामुळे सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया येत असताना आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने याबाबत एक पोस्ट केली आहे.
तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये खासदारांच्या निलबंनाचा व्हिडिओ शेअर करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "चला बिलं पास करून घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही...!! लोकशाही बसली धाब्यावर!!! हुकुमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास??" असं तेजस्विनीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तेजस्विनीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
विविधांगी भूमिका साकारून सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणारी तेजस्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तेजस्विनी समाजातील अनेक घडामोंडीबाबत तिचं मत अगदी परखडपणे मांडताना दिसते. याआधीही तिने टोलवसुलीच्या मुद्दयावर थेट भाष्य केलं होतं.