वा ! जिंकलंस पोरी, ही बातमी वाचून तुम्हीही कराल तेजस्विनीचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 03:30 PM2019-06-15T15:30:01+5:302019-06-15T15:32:12+5:30
तेजस्विनीने काही वर्षांपूर्वी अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या सिनेमातून तिच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले.
'फादर्स डे'च्या दिवशी आपल्या वडिलांसबोत कृतज्ञेतेचे सोशल मीडियावर अनेक पोस्ट पाहायला मिळतात. पण वडिलांची शिकवण लक्षात ठेवून त्यांचा वारसा ख-या अर्थाने पूढे चालवणारी खूप कमी लोकं असतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे वडील आता ह्या जगात नाहीत. पण तेजस्विनीने त्यांची शिकवण लक्षात ठेऊन ती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतेय.
नुकताच तेजस्विनीने यंदाचा 'फादर्स डे' मुंबई जवळच्या वृध्दाश्रमात जाऊन साजरा केला. ती म्हणते, “माझे वडिल आपला वाढदिवस वृध्दाश्रमात साजरा करायचे. त्यांना गरजेच्या असलेल्या वस्तू भेट म्हणून द्यायचे. आणि बाबांनी आमच्यावर तेच संस्कार केले. त्यामूळे ते गेल्यावरही मी अनेकदा वृध्दाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवते. ते आपल्यापेक्षा जास्त सक्रिय असतात. ज्यास्त मस्तीखोर असतात, असे मला दरवेळी जाणवते. यंदा पहिल्यांदाच मी मुंबई जवळच्या वृध्दाश्रमात भेट दिली.”
तेजस्विनी आपल्या वडिलांसोबतच्या आठवणी जागवताना म्हणते, “माझी आई मला नेहमी म्हणते, तुझे बाबा जाताना त्यांचे रूप तुझ्यात सोडून गेलेत. मी दिसण्यातच नाही तर गुणांमध्येही त्यांच्यावर गेलीय. माझे वडिल अत्यंत परखड, स्पष्टवक्ते, रसिक आणि तितकेच मस्तीखोर होते. बाबा हा माझ्यासाठी खूप हळवा विषय आहे.”