मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंचं केलं कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 10:23 AM2024-10-04T10:23:40+5:302024-10-04T10:24:46+5:30
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा' मिळाल्यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मनसे प्रमुख राज ठाकरेंचं कौतुक करत आनंद व्यक्त केला.
केंद्रातील एनडीए सरकारने मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी अभिजात दर्जा देण्याची मागणी होत होती. विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी (३ ऑक्टोबर) या निर्णयाची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मनसे प्रमुख राज ठाकरेंचं कौतुक करत आनंद व्यक्त केला.
तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर राज ठाकरेंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीलो दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी राज ठाकरेंच्या प्रयत्नाचं कौतुक केलं. तिने लिहलं, "मराठी भाषा आणि महाराष्ट्राचे राखणदार... प्रिय मराठी भाषा, २१ शतकाच्या प्रारंभी तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होणाऱ्या आमच्या मातृभाषेचे फक्त जाज्वल्य नाही तर हृदयस्थ अभिमान कसा बाळगायचा ते आम्हाला या माणसाने शिकवलं. राजसाहेब", या शब्दात तिने राज ठाकरेंचे कौतुक केलं.
मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी, आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या अख्यत्यारित ही बाब असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language Status to Marathi) मिळाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर माऊली वर्णन केलेल्या मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बातमी आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा संघर्ष हा आजचा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून याबाबत मागणी सुरु होती.