"खेळाला खेळच राहू दे", वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नींना आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्यांना तेजस्विनीने सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 12:52 PM2023-11-21T12:52:44+5:302023-11-21T12:53:22+5:30
ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपचा विश्वविजेता ठरल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नींना आणि मुलींना भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून आक्षेपार्ह मेसेज करण्यात आले. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने यावर भाष्य करत खडे बोल सुनावले आहेत.
यंदाच्या वर्ल्डकपवर नाव कोरत ऑस्ट्रेलिया संघ सहाव्यांदा विश्वविजेता बनला. भारताला फायनलमध्ये नमवत ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा वर्ल्डकपवर नाव कमावलं. ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपचा विश्वविजेता ठरल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नींना आणि मुलींना भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून आक्षेपार्ह मेसेज करण्यात आले. क्रिकेटर मॅक्सवेलची पत्नी विनीने याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्टही शेअर केली होती. आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने यावर भाष्य केलं आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटरच्या कुटुंबीयांना आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्यांना तेजस्विनीने सुनावलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मिशेल मार्शच्या कुटुंबीयांना, ट्रॅव्हिस हेडची मुलगी, पत्नी आणि ग्लेन मॅक्सवेलची भारतीय पत्नी यांना भारतीय चाहत्यांकडून आक्षेपार्ह मेसेज आल्याचं म्हटलं आहे. "जे मी वाचलं त्याचा फोटो शेअर करत आहे" असं म्हणत तेजस्विनीने पोस्ट लिहिली आहे.
"लोक एवढं विष का पेरतात? द्वेष सामान्य नाही. खेळाला खेळच राहू दे. हे सगळं sportingly घ्यायची गरज आहे," असं म्हणत तेजस्विनीने क्रिकेटरच्या कुटुंबीयांना मेसेज करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
आक्षेपार्ह मेसेजवर मॅक्सवेलची भारतीय पत्नी काय म्हणाली?
"हे सांगण्याची गरज भासते यावर विश्वास बसत नाही... पण तुम्ही भारतीय असू शकता, ज्या देशात जन्म घेतलाय त्याचे तुम्ही नक्कीच समर्थन करा. कारण इथेच तुमचे पालनपोषण झाले आहे आणि यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या संघाकडून तुमचा पती आणि आपल्या मुलाचे वडील खेळत आहेत. एक थंड गोळी घ्या आणि तुमचा आक्रोश इतरत्र जागतिक समस्यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर काढा."