"...तर AI आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं", रश्मिकाच्या डीपफेक व्हायरल व्हिडिओबाबत तेजस्विनीची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 06:41 PM2023-11-06T18:41:09+5:302023-11-06T18:41:50+5:30
नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही यावर आता भाष्य केलं आहे.
नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युजरने रश्मिकाचा हा व्हिडिओ फेक असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सर्वच स्तरातून या व्हिडिओवर प्रतिक्रिया येत असून टेक्नोलॉजीच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त होत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनी यावर कमेंट करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेही यावर आता भाष्य केलं आहे.
रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ रिसर्चर अभिषेकने ट्वीट केला होता. यामध्ये ती आनंदाने उड्या मारत लिफ्टमध्ये जात असल्याचं दिसत होतं. त्यात तिला विचित्र पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. या व्हिडिओसोबत अभिषेकने लिहिले, 'डीपफेक विरोधात कायदेशीर कारवाई आणि नियम बनवण्याची तात्काळ गरज आहे. तुम्ही रश्मिका मंदानाचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिला असेल. पण थांबा, ही रश्मिका नाही तर हा झारा पटेल नावाच्या महिलेचा डीपफेक व्हिडिओ आहे. झारा पटेल ही ब्रिटीश-भारतीय मुलगी आहे जिचे इन्स्टाग्रामवर ४ लाख फॉलोअर्स आहेत. तिने ९ ऑक्टोबरला हा व्हिडिओ अपलोड केला आहे. अभिषेकच्या या व्हिडिओवर तेजस्विनी पंडितने कमेंट केली आहे.
"टेक्नोलॉजीचा वापर कसा केला जाऊ नये, याचं हे उत्तम उदाहरण आहे. AIचा योग्य पद्धतीने वापर केला गेला नाहीतर तर ते आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतं. सतर्क राहा", अशी कमेंट तेजस्विनीने केली आहे.
डीपफेक व्हायरल व्हिडिओवर रश्मिकाची प्रतिक्रिया
रश्मिकाने व्हायरल झालेल्या डीप फेक व्हिडिओबाबत एक ट्वीट केलं आहे. "मला हे शेअर करताना अत्यंत दु:ख होत आहे. पण, ऑनलाईन व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओबाबत भाष्य करणं गरजेचं आहे. असा व्हिडिओ केवळ माझ्यासाठीच नाहीतर प्रत्येकासाठी भीतीदायक आहे. टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापरामुळे आपलं खूप नुकसान होत आहे.आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून मला पाठिंबा दिलेले कुटुंबीय, चाहते आणि मित्रपरिवाराची मी आभारी आहे. पण, जर मी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना हे माझ्याबरोबर घडलं असतं. तर याकडे मी कसं पाहिलं असतं याचा मी विचारही करू शकत नाही. अनेकांच्या बाबतीत हे घडण्याआधी एक समाज म्हणून याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे," असं रश्मिकाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.