"ताई खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण आयुष्य जगल्या...", सीमा देव यांच्या निधनामुळे अश्विनी भावे भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 02:27 PM2023-08-24T14:27:05+5:302023-08-24T14:28:13+5:30
Seema Deo : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या.
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांना अल्झायमर आजाराने ग्रासलं होतं. त्यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान अभिनेत्री अश्विनी भावे यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्री अश्विनी भावे यांनी इंस्टाग्रामवर सीमा देव यांचे फोटो शेअर करत लिहिले की, सीमा ताईंच्या निधनाची बातमी ऐकुन खूप दुःख होत आहे. सीमाताईंचे पडद्यावरचे लोभस रूप आणि त्यांच्या तरल अभिनयाने मी लहान वयातच खूप प्रेरित झाले होते. व्यवसाय आणि कौटुंबिक जबादारी यांचा योग्य समन्वय साधून त्यांनी स्त्री कलाकारांना एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि अजरामर भूमिकांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. स्त्रीच्या आयुष्यातल्या सर्वच भूमिका त्यांनी समर्थपणे पेलल्या. रमेश काकांवर आणि मुला-नातवंडांवर अपार प्रेम केलं.
त्या पुढे म्हणाल्या की, सीमा ताई खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण आयुष्य जगल्या. अजिंक्य, अभिनय आणि कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची ताकद लाभो आणि मृतात्म्यास शांती लाभो अशी मी ईश्वरा कडे प्रार्थना करते. ओम शांती !!
सीमा देव यांनी १९५७ साली 'आलिया भोगासी' या मराठी चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यांनी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. त्यांचे ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट प्रचंड गाजले. त्यांनी मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं होतं.