केतकी चितळेला ‘ती’ वादग्रस्त पोस्ट भोवणार, कोर्टानं फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 06:03 PM2021-09-10T18:03:38+5:302021-09-10T18:08:27+5:30
मराठमोळ्या अभिनेत्री अटकेची टांगती तलवार,जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
आपल्या परखड वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. सोशल मीडियावरच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या केतकीवर अटकेची टांगती तलवार आहे. प्रकरण वर्षभरापूर्वीचं असलं तरी आता ठाणे कोर्टानं तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
काय आहे प्रकरण
1 मार्च 2020 रोजी केतकीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. दलित समाजाबद्दलच्या या आक्षेपार्ह पोस्टसोबतच केतकीने एक नवा वाद ओढवून घेतला होता.
‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसºयांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वत:च्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वत:चा धर्म आम्ही विसरतो,’ अशी पोस्ट तिनं फेसबुकवर लिहिली होती. तिच्या पोस्टची तीव्र शब्दांत निंदा झाली होती. ‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क,’ या शब्दांवर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. केतकी चितळे हिची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात रबाळे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवी मुंबईतील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आणि वकील स्वप्नील जगताप यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्याच्या तक्रारीनुसार अभिनेत्रीवर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी आता ठाणे कोर्टानं केतकीचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे केतकीला अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याआधी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यावरून केतकी प्रचंढ ट्रोल झाली होती.