'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम

By संजय घावरे | Published: May 28, 2024 09:46 PM2024-05-28T21:46:31+5:302024-05-28T21:47:03+5:30

Chhaya Kadam : कान्समधील भव्य सिनेमागृहात स्वत:चा सिनेमा बघण्याचा, तिथे भारतीय चित्रपटाचा सन्मान होण्याचा, तिथल्या प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओवेशन मिळण्याचा आणि आईची आठवण असलेल्या मराठमोळ्या नथीसह तो सोहळा अनुभवण्याचे क्षण छाया कदमने थेट फ्रान्सवरून संवाद साधत 'लोकमत'सोबत शेअर केले.

The atmosphere in 'Cannes' was overwhelming - Chaya Kadam | 'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम

'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम

कान्स फेस्टिव्हल(Cannes Film Festival)मधील मुख्य स्पर्धेसाठी ३० वर्षांनंतर 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' हा भारतीय सिनेमा निवडला गेला. कान्सच्या ७७ वर्षांच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ग्रँड प्रिक्स पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय चित्रपट बनला. या चित्रपटात कनी कस्तुरी आणि दिव्या प्रभासोबत मराठमोळी अभिनेत्री छाया कदम(Chhaya Kadam)ही मुख्य भूमिकेत आहे. कान्समधील भव्य सिनेमागृहात स्वत:चा सिनेमा बघण्याचा, तिथे भारतीय चित्रपटाचा सन्मान होण्याचा, तिथल्या प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओवेशन मिळण्याचा आणि आईची आठवण असलेल्या मराठमोळ्या नथीसह तो सोहळा अनुभवण्याचे क्षण छाया कदमने थेट फ्रान्सवरून संवाद साधत 'लोकमत'सोबत शेअर केले. 

छाया म्हणाली की, एका परक्या देशात आपला सन्मान होणं हे एक भारी फिलिंग आहे. आपल्या मातीतील गोष्टी आणि आपलं जगणं लोकांना आवडतंय याचा आनंद आहे. ऑस्कर पुरस्कार पटकावणारे कलाकार-तंत्रज्ञ आपल्या चित्रपटासाठी टाळ्या वाजवताहेत हे पहाणं भारावून टाकणारं होतं. इतकी वर्षे रेड कार्पेटबाबत फक्त ऐकत होते, पण आता प्रत्यक्ष अनुभव घेतला. हि फॅशनची दुनिया असल्याचं फक्त आपल्यापर्यंत पोहोचत होतं. तिथल्या गाऊन्सची जगभर चर्चा होते. इथे येण्यापूर्वीपर्यंत माझ्या मनातही कान्सबाबत हेच चित्र होतं, पण इथली लोकं सिनेमासाठी किती वेडी आहेत हे इथे आल्यावर समजलं. इथलं वातावरण एक नवीन उर्जा देणारं आहे.

खरं 'कॅन्स'च आहे...
मी फ्रान्समधील कॅनमध्येच उतरले आहे. मुख्य स्पर्धेसाठी कॅनने मोठं हॅाटेल बुक केलं होतं. तिथलं एक वेगळंच जग होतं. बाहेर पडल्यावरही रस्त्यावर फोटोग्राफर्सची तोबा गर्दी असायची. मराठीत आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी 'कान्स' फेस्टिव्हल लिहिलं जातं, पण इथे 'कॅन' म्हटलं जातं. 

ही मुंबईची गोष्ट...
मुख्य विभागातील ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' या चित्रपटासोबत 'सिस्टर मिडनाईट' हा दुसरा चित्रपट कानमध्ये दाखवण्यात आला. तीन वेगवेगळ्या विचारांच्या स्त्रियांचा, त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि मैत्रीचा प्रवास 'आॅल वी इमॅजिन अॅज लाईट'मध्ये आहे. बाहेरून मुंबईत येणाऱ्या लोकांचं मुंबईसोबतच्या नात्याची गोष्ट. ही मुंबईची गोष्ट आहे.

डोळ्यांत पाणी होतं...
लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवताहेत हे खूप भारावून टाकणारं होतं. भाषा कुठेच आड येत नाही. इमोशन्स महत्त्वाच्या ठरतात. सिनेमा पाहिल्यावर मी तिथल्या लोकांच्या डोळ्यांत पाणी पाहिलं. प्रेक्षकही सुटा-बुटात असायचे. आम्ही भारतीय अभिनेत्री मंचावर होतो आणि समोर हॅालिवूडमधील दिग्गज उभे राहून टाळ्या वाजवत होते ते भारी होतं.

शिस्तबद्ध सोहळा...
इथली शिस्त पाहण्याजोगी होती. आपल्याकडच्या पुरस्कार सोहळ्यांपेक्षा हा खूप वेगळा होता. इथे नाच-गाणी नव्हती. कितीही मोठा कलावंत असला तरी मंचावर बोलण्यासाठी त्याला ठराविक वेळ असायचा. एकमेकांना कमालीची आदराची वागणूक दिली जाते. इथे दिसणं आणि रंगापेक्षा कामाला महत्त्व दिलं जातं. 

आई बरोबर हवी होती...
खरं तर मी साडीत जाणार होते, पण मित्र परिवार आणि इंडस्ट्रीतील गोतावळ्यामुळे कॅास्च्युम तयार केला. स्टायलिस्ट नेहा चौधरीने कॅास्च्युमवर मेहनत घेतली. मला खूप वेगळं दिसायचं असलं तरी ते कम्फर्टेबल असायला हवं आणि मला पटायला हवं असं तिला सांगितलं होतं. मला माझी आई बरोबर हवी होती. त्यामुळे तिची लग्नातली नथ घातली होती.
 

Web Title: The atmosphere in 'Cannes' was overwhelming - Chaya Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.